शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव; शिवसेना आमदाराचा आरोप

0
Abdul Sattar Shiv Sena,Shiv Sena, Abdul Sattar,मुंबई : शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव आहे. असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आरोप केला आहे. विधानसभेचा निकाल लागून नऊ दिवस उलटले, तरी सुध्दा युतीमध्ये सत्तासंघर्ष सुरुच आहे. शिवसेना आमदाराच्या आरोपामुळे युतीमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे.
आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेनेला समाजसेवा हवी आहे. शिवसेनेत समाजसेवा जास्त आणि राजकारणाला कमी महत्त्व आहे. परंतु भाजपाला सत्ता हवी आहे. भाजपाकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तावाटपा संदर्भात चर्चा न होण्याची अनेक कारणं आहेत. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे,” असं सत्तार यावेळी म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हा आरोप केला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीदरम्यान जे काही सांगितलं तसं ते वागले नाहीत. म्हणून आज अशी परिस्थिती उद्भवत आहे. मोठ्या भावाला छोटं करण्याचं षड्यंत्र रचलं जात असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते ओळखलं आहे,” असं सत्तार म्हणाले. भाजपाला राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिसत नाही. त्यांना केवळ खुर्चीची चिंता आहे. युतीमध्ये केवळ आपलं मत मांडून चालत नाही. असेही आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.

मुंबई पालिकेचा अजब फंडा; खड्डे दाखवा,पैसे कमवा!

0
pothole,BMC,मुंबई : मुंबईमध्ये खड्डे नसल्याचा दावा महापालिकेकडून वारंवार केला जातो. त्यातच बीएमसीने रस्त्यावर ‘खड्डे दाखवा आणि पैसे कमवा’ अशी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आज 1 नोव्हेंबर पासून  केली जाणार आहे. मात्र खड्ड्याच्या आकारमानाबाबत अटी-शर्थी लागू करुनच ही योजना प्रत्यक्षात उतरणार आहे.
मुंबईत महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्ते बांधतात. मात्र, रस्तांवर पडलेल्या खड़्ड्यांमुळे महापालिकेवर टिकेची झोड उठवली जाते. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचा अनुभव प्रत्येक मुंबईकराने घेतला आहे. कधी हॉटमिक्स तर कधी कोल्डमिक्स टाकून खड्डे बुजवल्याचा दावा केला जातो, मात्र रस्त्यावर खड्डे आहेत तसेच पुन्हा दिसतात. खड्डे ट्रॅकिंग अॅप, व्हॉट्सअॅप, ट्विटर अशा विविध सोशल मीडियांतून मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे पालिकेला दाखवा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे आजही तसेच असल्याने अखेर महापालिका प्रशासनाने नागरिकांना खड्डे निदर्शनास आणण्याचे आवाहन केले आहे. एक फूट लांब आणि तीन इंच खोल असलेल्या खड्डयाचा फोटो काढून पालिकेच्या खड्ड्यांच्या ट्रॅकिंग अॅपवर पाठवायचा आहे.
हा खड्डा 24 तासात बुजवला गेला नाही, तर संबंधित विभाग कार्यालयाने खड्डा निदर्शनास आणणाऱ्या नागरिकाला 500 रुपये द्यायचे आहेत. पालिका आयुक्तांनी सर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना असा संदेश पाठवला आहे.
पाचशे रुपये कमवण्यासाठी महापालिकेच्या या आहेत अटी…
1.नागरिकांनी दाखवलेला खड्डा कमीत कमी 1 फूट लांब आणि 3 इंच खोल पाहिजे
2.तक्रारीनंतर 24 तासांत खड्डा भरला गेला, तर पैसे मिळणार नाहीत.
3.खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘My BMC pothole fixlt’ या अॅपवर जाऊन खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल

बँकांच्या नियमांमध्ये आजपासून बदल

0
नवी दिल्ली : देशातील बँकाच्या काही नियमांमध्ये आज 1 नोव्हेंबरपासून बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेच्या वेळापत्रापासून ते भारतीय स्टेट बँकेच्या ठेवींवरील व्याजाच्या दरापर्यंत अनेक नियम बदलण्यात आले आहेत. ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणारा व्यापारी सवलत दर आकारला जाणार नाही.
कामकाजाच्या वेळेत बदल…
राज्यातील सर्वच पब्लिक सेक्टर बँकांच्या कामकाजाच्या वेळेत आज 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार निवासी क्षेत्रांमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बँका सुरु राहातील. त्याशिवाय, आर्थिक कामकाज हे सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. तर काही भागांमध्ये बँकांच्या कामकाजाचा वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

ठेवींवरील व्याजाच्या दरात बदल…

1 नोव्हेंबरपासून ठेवींवरील व्याजाच्या दरातही बदल होणार आहे. या बदलावानंतर एसबीआय ग्राहकांना 1 लाखांच्या ठेवीवर 3.50 नाही तर 3.25 व्याजदरानुसार व्याज देईल. पण, 1 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांना जुन्या व्याजदराप्रमाणेच व्याज मिळेल.

MDR घेतला जाणार नाही…

वित्त मंत्रालयाने आजपासून पेमेंट नियमांध्येही बदल केले आहेत. हे बदल 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकांवर लागू होईल. या बदलानंतर डिजीटल पेमेंट अनिवार्य असेल. मात्र, यामध्ये एक सूटही देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, व्यावसायिकांकडून एमडीआर आकारला जाणार नाही.

धनंजय मुंडेंनी हेरगिरी थांबवण्याची राज्यपालांकडे केली मागणी

0

Dhananjay Mundeमुंबई : ‘व्हॉट्सअॅप’ या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरू असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक आहे. ही हेरगिरी बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले असून, त्यामध्ये मुंडे यांनी सांगितले की, ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून देशातील जनतेच्या, पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडिओ, ऑडिओ संवादासारखी वैयक्तिक, खासगी स्वरूपाची सगळीच माहिती काढून घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात २० एप्रिल ते १० मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेने मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केल्याचे व त्याबद्दल अमेरिकेतील एका न्यायालयात खटला दाखल झाल्याचे वृत्त एका आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्याकडे मुंडे यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे.

‘व्हॉट्सअॅप’च्या हेरगिरीमागे शासकीय व्यवस्थेतील संस्थांचा सहभाग असण्याची शक्यताही मुंडे यांनी व्यक्त केली. शासकीय यंत्रणांनी यापूर्वीही अनेक प्रकरणांत अशा पद्धतीने नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात घुसखोरी, हेरगिरी केल्याचे वारंवार समोर आले आहे. हे निषेधार्ह, संतापजनक आहे. नागरिकांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडणे, त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात डोकावणे व तेथून त्यांच्या व्यक्तिगत, खासगी, संवेदनशील माहितीची चोरी करणे हा गंभीर अपराध आहे. असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस आमदाराने घेतली उद्धव ठाकरेंशी भेट

ruturaj patil congress shivsena
शिवसेना भाजपा सत्तासंघर्ष सुरु असताना काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे नवर्निवाचीत आमदार ऋतुराज पाटील यांनी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

आमदार ऋतुराज पाटील यांनी रात्री 12 च्या सुमारास मातोश्रीवर भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली अशीही माहिती समोर येत आहे. मातोश्रीतून बाहेर निघाल्यावर ऋतुराज यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र या भेटीमागचे कारण काय हे स्पष्ट झाले नाही.

कोण आहेत ऋतुराज पाटील…

ऋतुराज पाटील हे शिक्षण सम्राट ओळख असलेले डी. वाय. पाटील यांचे नातू आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पहिल्यांदाच ऋतुराज निवडणूक रिंगणात उतरले होते. तसेच पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जोरदार विजय ही मिळवला. ऋतुराज पाटील माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज यांना उमेदवारी मिळाली होती. कोल्हापूर दक्षिण हाय-टेन्शन मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यावेळी ऋतुराज यांच्याविरोधात भाजपचे अमल महाडिक निवडणूक रिंगणात होते. या अटीतटीच्या लढतीत पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तरुण आमदार म्हणूनही ऋतुराज पाटील यांचे नाव घेतले जाते.

काँग्रेसने शिवसेना- भाजपच्या नाटकात हस्तक्षेप करु नये : संजय निरुपम

0

Sanjay Nirupam
मुंबई : शिवसेना – भाजपाच्या सत्तासंघर्षात काँग्रेसने उडी घेतली आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिला तर विचार करू असे विधान काँग्रेस नेत्यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम काँग्रेस नेत्यांनर संतापले आहेत. शिवसेनेची साथ देण्याविषयीचं वक्तव्य करणाऱ्यांना, ‘तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?’, असा थेट सवाल निरूपम यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत निरुपम यांनी आणखी एक ट्विट केलं, ज्यामध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मी पुन्हा हेच सांगू इच्छितो की, काँग्रेसने शिवसेना- भाजपच्या या नाटकात हस्तक्षेप करु नये. सत्तास्थापनेत्या बाबतीत स्वत:चा वाटा मिळवत सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी हा त्यांचा क्षणिक वाद आहे. ते पुन्हा एकत्र येतील आणि आपल्याला निशाण्यावर घेतील’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.

शिवसेना- भाजप युतीमध्ये सत्तेच्या मुद्यावरुन सुरु असणारा सध्याचा वाद आणि त्यातच काही काँग्रेस नेत्यांकडून शिवसेनेला पाठींबा दिलं जाण्याचं वक्तव्य, दिल्लीत होणाऱ्या पक्षश्रेष्ठींच्या बैठका या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी काँग्रेस नेत्यांपुढे थेट प्रश्न मांडला आहे. ‘शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काही काँग्रेस नेते पुढे येतातच कसे? त्यांचं डोकं तर ठिकाणावर आहे ना?’, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, एकिकडे निरुप यांनी हे ट्विट केलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत भाजपला इशारा दिला. शुक्रवारी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत, भाजपने एकट्याने सत्तास्थापनेचं धाडस करु नये असा इशारा दिला.

शिवसेना काँग्रेस महाआघाडीचा ‘हात’ धरणार?

0
Congress Shiv Sena NCPमुंबई : शिवसेना-भाजपात रस्सीखेच सुरु असल्यामुळे शिवसेना भाजपाची साथ सोडण्याच्या तयारी आहेत. शिवसेना काँग्रेस महाआघाडीचा ‘हात’ धरूण सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वहर ओक निवासस्थानी भेट घेतली. आज शुक्रवारी राऊत यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा दावा केला. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपा २०१४ प्रमाणेच यावेळीही अल्पमतातील सरकार स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता भाजपाला शिवसेनेची साथ मिळणं जरा कठिण दिसतंय. भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी 145  चा मॅजिक फिगर नाही. त्यामुळे अल्पमताचं सरकार स्थापन केलं तर त्यांना विधीमंडळात बहुमत सिध्द करावं लागेलं त्यामुळे भाजपाची नऊ दिवसापासून गोची झालेली आहे.
भाजपा बहुमत सिद्ध करू शकले नाही तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली होऊ शकतात. त्यामुळेच विधानसभेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता वाढलीय. शिवसेनेला सत्तेचा समसमान वाटा मिळाला नाही तर शिवसेना भाजपा युतीचा काडीमोड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस दिल्लीमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय आदेश देतात यावर शिवसेनेचीही भूमिका अवलंबून राहिल. यामुळे राज्याच्या घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : संजय राऊत

0
sanjay raut shivsenaमुंबई : महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
संजय राऊत यांनी दावा केला की, शिवसेनेनं ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झालं पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. वाटाघाटी व्यापारी करतात, आम्ही नव्हे असा टोला  संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  लगावला. निकाल लागून नऊ दिवस उलटले असून भाजपने आमच्याशी चर्चा का केली नाही. भाजपाकडे 145 चा बहुमत असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावी असेही संजय राऊत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जी भेट घेतली त्यामागे राजकारण शोधू नका. ते भारताचे मोठे नेते आहेत. त्यांच्याशी भेटण्यात गैर काय असा सवाल संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसे घडणार असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. राज्यात ओला दुष्काळ पडला असून उध्दव ठाकरे हे औरंगाबाद दौ-यावर जाणार आहेत असेही संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये गुफ्तग

sharad pawar sanjay raut
मुंबई : युतीमध्ये सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोघांमध्ये सत्तासंघर्षावर गुफ्तगू झाली.

संजय राऊत यांनी शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याची चर्चा आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तास्थासंघर्षावरून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी!

0

Drought Maharashtraमुंबई : महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांच नुकसानं झालं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे. शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गुरुवारी संध्याकाळी केली.

यावेळी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरेंसह सर्व शिवसेनेचे आमदार, नेते, उपस्थितीत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही राज्यपालांकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तसेच शेतक-यांना ताबडतोब नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी राज्यपालांनी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. कमी अधिक प्रमाणात खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. काढणीला आलेली पिके पावसामुळे हिरावली गेली आहेत. त्यामुळे पाणी-चारा टंचाईला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण भागातही पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे शेतमाल सडू लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अपेक्षित किंमत मिळत नसून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करण्यात यावे. शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.