सेहवागकडून टेलरचा ‘दर्जी’ उल्लेख!

मुंबई: हटके ट्विटमुळे सोशल मीडिया गाजवणारा टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने, न्यूझीलंडच्या विजयानंतरही तसंच हटके ट्विट केलं. न्यूझीलंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा फलंदाज रॉस टेलरला उद्देशून हे ट्विट होतं. सेहवागने रॉस टेलरचा भारतीय भाषेत ‘दर्जी’ असा उल्लेख केला.

सेहवागच्या ट्विटला रॉस टेलरनेही तसंच उत्तर दिलं, तेही हिंदीत.

आधी सेहवाग म्हणाला, “वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”.

सेहवागच्या या ट्विटला रॉस टेलरने हिंदीत उत्तर दिलं.

“भाई, अगली बार अपना ऑर्डर टाईम पे भेज देना, सो मै आपको अगली दिवाली के पहले डिलिव्हर करुंगा.. हॅप्पी दिवाली”, असं टेलर म्हणाला.

या ट्विटनंतर गप्प बसेल तो सेहवाग कुठला. सेहवाने टेलरच्या या ट्विटलाही उत्तर दिलं. यावेळी सेहवागने फाईव्ह स्टारच्या जाहिरातीतील डायलॉग मारुन टेलरला उत्तर दिलं.

सेहवाग म्हणाला, “हाहाहा, मास्तरजी, इस साल वाली पतलून एक बिलांग छोटी करके देना नेक्स्ट दिवाली पे. रॉस द बॉस, मोस्ट स्पोर्टिंग”.

यावर टेलरने उपरोधी टोला लगावत,“तुमच्या टेलरने या दिवाळीत चांगले कपडे शिवले नाहीत का?” असं ट्विट केलं.

 

यानंतरही सेहवाग शांत बसला नाही. सेहवाग म्हणाला, “दर्जी जी, तुमच्या इतक्या उच्च दर्जाच्या शिवणकामाची स्पर्धा कोणीच करु शकत नाही. मग ते पँट असो वा पार्टनरशीप”

जर्मनीत रानडुक्कर बॅंकेत घुसले

हेड : जर्मनीतील हेड शहरात दोन रानडुक्करांनी  दोन दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला. यातील एका रानडुक्कराने एका बॅंकवर केलेल्या हल्ल्यात चार लोक गंभीर जखमी झाले होते. त्या रानडुक्करास ठार मारण्यात अखेर पोलिसांना यश आले तर एक रानडुक्कर फरार झाले.

सकाळी नऊच्या सुमारास हेड शहराच्या रस्त्यांवर ही रानडुक्करं फिरताना दिसत होती. या रानडुक्करांचं वजन तब्बल ७० किलो होतं. त्यातील  एक रानडुक्कर चष्म्याच्या दुकानात शिरलं. तेथील  मालाची या रानडुक्कराने नासधूस केली.  नंतर तिथून हे एका बॅंकेतही  शिरलं. तिथे रानडुक्कराच्या हल्ल्यामुळे एक माणूस गंभीर जखमी झाला.तर एका माणसाच्या बोटाचा तुकडा पडला.  बॅंकेतील एकूण  ४ जखमींनी स्थानिक रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. या रानडुक्कराचे  सगळे कारनामे सीसीटीव्हीत कैद झाले. तर टेलिस्कोपच्या माध्यामातून त्याच्यावर लक्षही ठेवण्यात आलं. अखेर या रानडुक्कराला गोळ्या घालून ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले. पण या सगळ्या गोंधळात दुसरे रानडुक्कर शहराच्या बाहेर निसटले.

मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज

इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मुंबईकरांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज भासत असून देशात मानसोपचाराची गरज असणाऱ्या शहरात मुंबई पहिल्या तर राज्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे. जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीनं हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई (३८ हजार ५८८), कोलकाता (२७ हजार ३९४), बंगळुरु (२४ हजार ३४८) या शहरांतील नागरिक सर्वाधिक मानसिक उपचार घेत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेत असल्याचंही या अहवलात म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. १० वर्षांच्या चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसोपचार घेण्यासाठी येतात. मात्र मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असल्याचंही यातून समोर येतं. सातत्याने होणारा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हा विकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं, जे. जे. रूग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. युसूफ माचिसवाला यांनी सांगितलं. पूर्वी वयस्कर लोकांमध्ये मनोविकारांची लक्षणं आढळायची. आता तरुणांमध्ये हे प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे या तरूणांमध्ये मनोविकाराबाबतची जागृती करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

फेसबुकमुळे येणारा तणाव, सायबरशी निगडीत समस्या आणि ऑनलाइन गेमच्या आहारी जाणं यासारखे काही नवीन विकार तरुणांमध्ये बळावताना दिसत आहेत. हे विकार यापूर्वी नव्हते. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिक विकाराचा सामना करणारी अनेक मुलं आमच्याकडे उपचाराला येतात, असं केईएमचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळेही अनेकांचं मानसिक खच्चीकरण होऊन त्यांना मानसिक आजारांना सामोरे जावं लागत आहे. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया यामुळेही लोकांच्या मानसिकतेवर आघात केला जात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार निर्माण झाले आहेत. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. त्याला मुंबईकरांची जीवनशैलीही कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

मानसोपचार घेणारी राज्यं

पश्चिम बंगाल ( २ लाख ७५ हजार ५७८)
महाराष्ट्र (१ लाख २४ हजार ४००)
कर्नाटक (१ लाख १६ हजार ७७१)

नव्याने निर्माण झालेले विकार

फेसबुक डिप्रेशन
सायबर बुलिंग
ऑनलाईन गेम अॅडिक्शन
बॉडी इमेज इश्यू

सौराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटला राजधानीने चिरडले

पालघर : राजधानी एक्स्प्रेसखाली आल्यामुळे सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा जागीच मृत्यू झाला. लोको पायलट इंजिन तपासणीसाठी उतरला असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

रविवारी संध्याकाळी बोईसरजवळ सौराष्ट्र एक्स्प्रेस साईडिंगला लावण्यात आली होती. ट्रेनच्या इंजिनच्या तपासणीसाठी लोको पायलट उमेश चंद्र आर हे उतरुन इंजिनखाली गेले. त्याचवेळी समोरुन राजधानी एक्स्प्रेस येत होती. समोरुन येणारी राजधानी एक्स्प्रेस पाहून उमेश गडबडले आणि स्लीपरवर घसरुन राजधानी एक्स्प्रेसखाली आले. यामध्ये ४५ वर्षीय उमेश यांचा जागीच मृत्यू झाला. वलसाडहून नवीन चालक आल्यानंतर रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ट्रेन गुजरातकडे रवाना झाली.

आंदोलकांच्या खरेदीसाठी भाजपकडे ५०० कोटींचं बजेट : हार्दिक

गांधीनगर (गुजरात) : सत्तेविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना खरेदी करण्यासाठी भाजपकडे ५०० कोटींचं बजेट आहे, असा गंभीर आरोप गुजरातमधील युवा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. हार्दिक पटेल हा गुजरातमधील पाटीदार समाजाचं नेतृत्त्व करतो.

“सत्तेविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना खरेदी करण्यासाठी भाजपकडे ५०० कोटींचं बजेट आहे. मला समजत नाही की, विकास केला आहे, तर खरेदी का?”, असा आरोप करत हार्दिक पटेल याने भाजपला थेट इशारा दिला आहे की, “गुजरातमधील जनता इतकी स्वस्त नाही की, कुणी त्यांची खरेदी करावी. गुजरातमधील जनतेचा अपमान केला जात असून, जनता या अपमानाचा बदला घेईल.”

“भाजपविरोधात केवळ मी नव्हे, गुजरातमधील 6 कोटी जनता लढत आहे. व्यापारी, शेतकरी, सर्व समाज आणि कामगार भाजपच्या हुकूमशाहीला कंटाळले आहेत.”, असेही हार्दिक पटेल म्हणाला. गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हार्दिक पटेलने आपला भाजपविरोध आणखी तीव्र केला आहे. हार्दिक पटेलला पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचे धाबे दणाणले आहे.

‘त्या’ शेतकऱ्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार

नागपूर: बंदी असलेली कीटकनाशकं बाजारात आल्याने शेतकऱ्यांचा बळी गेला. ही अत्यंत गंभीर बाब असून फवारणीमुळे झालेल्या मृत्यूस कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केला.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी कृषी मंत्रालयाच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. गेल्या एक-दोन वर्षातच बाजारात बंदी असलेली कीटकनाशकं मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुर्देवानं जीव गमवावा लागला आहे. यावर नियंत्रणासाठी कायदा आणि स्वतंत्र व्यवस्था आहे. पण त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. याला कृषी मंत्रालयच दोषी आहे, असं पवार म्हणाले.

राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चुकीचे नियोजन केले. नियोजनाशिवाय कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली, असं सांगतानाच कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी १० ते १५ दिवस वाट पाहू. त्यानंतर आंदोलन करू, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

रिंकू आणखी एका मराठी चित्रपटात!

रिंकू राजगुरूनं सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सैराटला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर  अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्या चित्रपटाची. आता दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रिंकू राजगुरू लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, सर्वांना भावेल असं कथानक या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सोबतच श्रवणीय संगीताची पर्वणीही असेल. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सुधीर कोलते यांनी या पूर्वी ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.

मकरंद आणि रिंकू या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच मकरंद आणि रिंकू दोघंही अकलूजचे आहेत. मकरंदचा ‘रिंगण’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवला गेला आहे.

चित्रपटाविषयी माहिती देताना मकरंद म्हणाला, ‘चित्रपट सर्वांना भावेल अशी मला खात्री वाटते. आपण जेव्हा एखाद्या कथेची मांडणी करत असतो, तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानुसार त्या सर्व बाबींचा शोध सुरू होतो. रिंकूच्या रूपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला. चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तात्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. तिनं या चित्रपटात काम करणं ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.’

पुण्यात तृतीयपंथीयांच्या पहिल्या मठाची स्थापना

पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर पुण्यात तृतीयपंथीयांनी आपल्या नव्या मठात प्रवेश केला. पुण्यातील गणेशपेठेत हा मठ उभारण्यात आला असून, तृतीयपंथीयांनी लक्ष्मीपूजनादिवशी मठात गृहप्रवेश केला. तृतीयपंथीयांच्या मठाची सवत्र चर्चा रंगली आहे.

शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गणेशपेठेत तृतीयपंथीयांनी एकत्रित येऊन एक मठवजा घर बांधलं होतं. मात्र, गेली अनेक दशके या जुन्या घरात गरजेच्या अनेक सोईसुविधा अपुऱ्या पडू लागल्या. त्यातच परिवारातील व्यक्तींचा संख्याही वाढली.

सध्या या परिवारातील सदस्यांची संख्या ४० च्या वर आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून शासनाच्या अनुदानाशिवाय आपल्या घर वजा मठाचा कायापालट केला. एका सूसज्ज इमारतीसह या मठात वाय-फाय इंटरनेटसह अनेक अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तृतीयपंथीयांनी मठात गृहप्रवेश करुन लक्ष्मीपूजन केलं. यापुढे या मठात वृद्ध आणि वंचित तृतीयपंथीयांना आश्रय दिला जाणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या नेत्यांना अटक

कल्याण : फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कल्याणात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे.

डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या एकूण १२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, मनसे कार्यकर्ते स्वतःहून महात्मा फुले चौक आणि रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाले.

काय आहे प्रकरण?

रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली १५ दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर काल मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २५ ते ३० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जपानवर शिंजो अॅबेंच साम्राज्य!

टोकियो, जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झालाय. ४६५ जागांपैकी अॅबेंच्या युतीला तब्बल ३१२ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत अॅबेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. डिसेंबर २०१२ पासून अॅबे पंतप्रधानपदी विराजमान आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि उत्तर कोरियाला अद्दल घडवणे या दोन मुद्द्यांवर ते पुन्हा निवडून आले आहेत.

यावर्षी अॅबेंच्या विरूद्ध युरिको कोईके आपला नवा पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.त्यांना सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे ही निवडणुक अॅबेंसाठी प्रतिष्ठेची झाली होती. पण कोईकेला ५० जागाही मिळवता आल्या नाहीत. आणि अॅबेंनी आपले पंतप्रधानपद कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.

आता या विजयामुळे पूर्व आशियातलं राजकारण आणखी तापणार की काय, अशी भीती जगात निर्माण झालीय.अॅबे आणि आपल्या पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे परराष्ट्र धोरणांमध्येही सातत्य राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.