नागपूर: बंदी असलेली कीटकनाशकं बाजारात आल्याने शेतकऱ्यांचा बळी गेला. ही अत्यंत गंभीर बाब असून फवारणीमुळे झालेल्या मृत्यूस कृषी मंत्रालयच दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केला.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी कृषी मंत्रालयाच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. गेल्या एक-दोन वर्षातच बाजारात बंदी असलेली कीटकनाशकं मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुर्देवानं जीव गमवावा लागला आहे. यावर नियंत्रणासाठी कायदा आणि स्वतंत्र व्यवस्था आहे. पण त्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. याला कृषी मंत्रालयच दोषी आहे, असं पवार म्हणाले.
राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे चुकीचे नियोजन केले. नियोजनाशिवाय कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली, असं सांगतानाच कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी १० ते १५ दिवस वाट पाहू. त्यानंतर आंदोलन करू, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.