राज्याच्या हितासाठी पवारांनी मताचा विचार कधीच केला नाही : मुख्यमंत्री

अमरावती : महाराष्ट्राच्या हिताची बाब असेल तर शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरुस्त करणारे शरद पवारच आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंडभरुन कौतुक केलं.

अमरावतीत शरद पवारांचा सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आयोजित सत्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

कृषी क्षेत्रात पवारांचं योगदान अमुल्य

शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शेती क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम झालं. पवारांना संरक्षण खातं सहज मिळालं असतं. मात्र त्यांनी दहा वर्षे कृषी मंत्रालय सांभाळलं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या कारकीर्दीचं कौतुक केलं.

कर्जमाफीसाठी पवारांचं मार्गदर्शन

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही. मात्र सध्या कर्जमाफीची अत्यंत गरज होती. सरकारने जेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा पवारांना फोन केला. चर्चेसाठी त्यांनी दिल्लीला बोलावलं. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते होते आणि भाजपचेही होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या काही मागण्या पवारांनाही मान्य नव्हत्या. राज्याचा विचार करत कर्जमाफीबद्दल शरद पवारांनी मार्गदर्शन केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पवार राजकारणाच्या, पक्षाच्या पलीकडे पाहतात

आमचा डीएनएच विरोधी पक्षाचा आहे. विरोधी पक्ष कसा काम करतो ते आम्हाला माहिती आहे. सत्तापक्ष काय असतो ते आत्ता कळलं. विरोधात असताना अवास्तव मागण्यांनी लोक खुश होतात आणखी काही नाही. पण शरद पवार नेहमी राजकारणाच्या आणि पक्षाच्या पलीकडे पाहतात. प्रत्येक राज्यात एकतरी अशी व्यक्ती असली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

नरेंद्र मोदींमुळे गुजरात होतेय बदनाम- मनीष तिवारी

नवी दिल्ली– गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला आता निवडणुकीत पराभवाची भीती सतावत आहे. त्यामुळे भाजप चुकीच्या पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे. भाजपच्या या षडयंत्रात निवडणूक आयोगही सहभागी असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्त मनीष तिवारी यांनी आज (सोमवार) नवी दिल्लीत केला.

मनीष तिवारी यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर का केल्या नाहीत.? आयोगाने तारखा तात्काळ जाहीर करून गुजरातमध्ये आचारसंहिता लागू करावी.

नरेंद्र मोदींमुळेच गुजरात बदनाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात बदनाम होत आहे. गुजरातची जनता आता मोदींच्या भूलथापा बळी पडणार नाही. त्यामुळे भाजपने आतापासूनच नेत्यांचा घोडेबाजार सुरु केला आहे. गुजरातमधील जनतेने भाजपविरोधात विद्रोह सुरु केला आहे.

फेरीवाले धोरण सोडवण्यात सरकारचा नाकर्तेपणा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाले विरोधात ‘खळळ खट्याक’ वरुन ‘राज’कारण तापवले आहेत. राजकारण तापवायला खऱ्या अर्थाने सरकारच जबाबदार आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर सरकारने फेरीवाला हा विषय गांभीर्याने घेतला असता तर कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातून,परराज्यातून मुंबापुरीत लाखो नागरिक दाखल झालेले आहेत. फेरीवाल्यांमुळे रहदारीच्या ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र हे का घडत आहेत.याकडे सरकारने,महापालिकेने गांभीर्याने विचार केले असते तर फेरीवाल्यांवर हल्लेही झाले नसते आणि त्यांच्यामुळे इतर नागरिकांना त्रासही झाला नसता. रेल्वे स्थानक, फूटओव्हर ब्रीज, स्कायवॉक, बस स्टॉप, टॅक्सी स्टँड या परिसरात जर फेरीवाले असतील, तर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे या परिसरात फेरीवाले नसावेत, परंतु स्थानकापासून काही अंतरावर बाजारपेठा, लहान-मोठ्या मंडया असाव्यात, ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा तर वाचेलच, परंतु फेरीवाल्यांमुळे कोणतीही अडचण होणार नाही. न्यूयॉर्क, रॉटरडॅम, अ‍ॅम्सटरडॅम, पॅरीस आणि बर्लिन ही नगर नियोजनात फेरीवाल्यांना सामावून घेणाऱ्या प्रमुख शहरांची उदाहरणे आहेत. या शहरांमध्ये रेल्वे स्थानक अथवा जेथे गर्दीचे योग्य नियोजन होईल, अशा अरुंद रस्त्यांवर फेरीवाल्यांना जागा देण्यात आली आहे. फेरीवाले समस्या बनू नयेत, यासाठी फेरीवाल्यांची संख्या निश्चित केलेली आहे. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे. रेल्वे स्थानके अथवा मेट्रो स्थानकांमध्ये फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र गाळे देण्यात आले आहेत. फेरीवाले ग्राहकांना हवे असतात, परंतु मोठ्या दुकानदारांना फेरीवाले नको असतात. मोठमोठ्या दुकानांपेक्षा लोक फेरीवाल्यांकडून साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे मोठ्या दुकानदारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो. म्हणून मोठे दुकानदार हे फेरीवाल्यांना विरोध करतात. बहुतेक वेळा फेरीवाले हटविण्यासाठी दुकानदार पालिकेचे दार ठोठावतात. पालिका आणि राज्य शासनाने फेरीवाल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत दोन-तीन धोरणे तयार केली, परंतु त्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्याने, फेरीवाले वाढत गेले आणि शहरभर फोफावत गेले. गेल्या कित्येक वर्षांमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला आहे. त्यामुळे धोरण तयार केले, तरी त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मुंबईत ७० लाखांपेक्षा जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर अगोदरच गर्दी आहे. त्यात अधिक भर फेरीवाल्यांचा आणि फेरीवाल्यांकडून साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे बाजारपेठा, मंडया या रेल्वे स्थानकापासून दूर असाव्यात. रेल्वे स्थानकांचा वापर फक्त प्रवासी आणि चाकरमान्यांकडून झाला, जर रेल्वे स्थानकांवरील कोंडी काही प्रमाणात कमी होईल. शहरात बेकारी आहे, तोपर्यंत फेरीवाले तयार होतच राहणार. शहरातील बेकारी कमी करण्यात प्रशासनाला यश आले, तर फेरीवाले कमी होतील. रेल्वे स्थानके, रस्ते आणि पदपथांवरील फेरीवाल्यांमुळे नागरीकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पादचारी व फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे राजकीय भांडवल होऊ नये. मुळात काही धोरणांचाही विचार केला पाहिजे. कमर्शियल सेक्टर आणि इमारतींना मुंबई बेटात स्थान देऊ नये आणि सर्व कमर्शियल सेक्टर उपनगरांमध्ये हलवावे, अथवा नवे कमर्शियल सेक्टर उपनगरांमध्ये, वांद्रे-कुर्ला संकुलात उभारावे, असे धोरण तयार करण्यात आले, परंतु त्याच वेळेला मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी शासनाकडून कमर्शियल सेक्टरसाठी देण्यात आल्या. दक्षिण मुंबईतील व्यवसाय, धंदे, कमर्शियल सेक्टर नवी मुंबईत हलवावे, अथवा नवे कमर्शियल सेक्टर तयार करावे, असे धोरण तयार करण्यात आले, परंतु त्याच वेळेला दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंटसारख्या भागात समुद्रात भरणी टाकून जमीन तयार करून, त्या जमिनी कमर्शियल सेक्टरसाठी देण्यात आल्या. त्यामुळे प्रशासनाच्या अशा परस्परविरोधी धोरणांमुळे फेरीवाले, गर्दी आणि कोंडीसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे. थातुर मातूर कारवाईने प्रश्न सुटणार नाही तर ठोस मार्ग काढावा लागेल. अन्यथा नेहमीच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत राहिल.

डीजे बंद करण्यावरून कुटुंबाला पोलिसांची मारहाण

अमरावती: अमरावतीत डीजे बंद करण्यावरून गाडगेनगरमध्ये पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय. बिल्डर राजू तिवारी यांच्या मुलाचा राहुलचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्त फन लँड इथं डीजे लावण्यात आला होता. तिथे डीजे बंद करा सांगण्यासाठी आलेल्या ३ पोलिसांचा आणि तिवारी कुटुंबाच्या काहींचा वाद झाला. याचा राग मनात धरून पोलीस ४० पोलिसांना घेऊन परत आले. आणि त्यांनी म्हातारे, लहान मुलं न पाहता सगळ्यांना प्रचंड मारहाण केली.

या मारहाणीत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मनीषा आहिरे यांचं ३ठिकाणी हाड तुटलं आहे. लीना अहिरे या एअर होस्टेसलाही मारहाण करण्यात आलीये. याची तक्रार करण्यासाठी आज या सगळ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालय सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आता या प्रकरणी आयुक्तांनी डीसीपी चिन्मय पंडित यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

चंद्रकातदादांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा: आमदार क्षीरसागर

कोल्हापूरमहसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा गैरवापर करत अमाप संपत्ती मिळवली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयातर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राजेश क्षीरसागर म्हणाले, “चंद्रकांतदादा पाटील यांची २०१४ मध्ये आमदार होते त्यावेळची संपत्ती आणि सध्याची संपत्ती यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याची प्रमुख उदाहरणं म्हणजे गणेशोत्सव, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांची केलेली खरेदी आहे.

चंद्रकांतदादांची टेलिमॅटीक कंपनी २०१४ पर्यंत पूर्णत: नुकसानीत किंवा कमी प्रमाणात फायद्यात होती. आता त्यांनी कोट्यवधी कमावले आहेत. या कंपनीची काही गुंतवणूक त्यांनी परदेशात केली. त्यामुळे याबाबतची चौकशी होणं गरजेचं आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्यात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी अनेक सहकाऱ्यांच्या नावे पैसे ठेवले आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. या सर्वाची चौकशी ईडीने करावी”

गुजरात विकत घेतले जाऊ शकत नाही- राहुल गांधीं

नवी दिल्ली: भाजप प्रवेशासाठी १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपवर बरसले. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना ‘गुजरात अमूल्य असून ते विकत घेता येऊ शकत नाही,’ असा टोला राहुल गांधी यांनी भाजपला लगावला. ‘गुजरात कधीही विकले जात नव्हते. ते कधीही विकत घेतले जाऊ शकत नाही आणि यापुढेही कोणीही ते विकत घेऊ शकणार नाही,’ असे राहुल यांनी म्हटले.

पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या हार्दिक पटेल यांचे सहकारी नरेंद्र पटेल यांनी रविवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी ५०० रुपयांच्या नोटांची बंडले टेबलवर ठेवली होती. ‘भाजप प्रवेशासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यातील १० लाख रुपये मला अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. भाजप प्रवेशानंतर उर्वरित रक्कम देण्यात येणार असल्याचे आश्वासन मला देण्यात आले. नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले वरुण पटेल मला प्रदेशाध्यक्षांकडे घेऊन गेले होते. त्यांनीच मला टोकन रक्कम म्हणून १० लाख रुपये दिले,’ असा सनसनाटी आरोप नरेंद्र पटेल यांनी केला. याच पार्श्वभूमीवर बोलताना, कोणीही गुजरातला विकत घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

‘वरुण पटेल मला गांधीनगरमध्ये घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी मला भाजपच्या कार्यालयात नेले. तिथे प्रदेशाध्यक्ष जितूभाई वघानी आणि काही मंत्री उपस्थित होते. त्यानंतर मला एका खोलीत नेण्यात आले. तिथे १० लाख रुपये असलेली एक बॅग मला देण्यात आली. ही रक्कम टोकन असल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी भाजपच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर उर्वरित ९० लाख रुपये देण्यात येतील, असेही मला सांगण्यात आले,’ असे नरेंद्र पटेल यांनी पत्रकारांना सांगितले.

गुजरातमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या गुजरातमधील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर असून ते ओबीसी समाजाच्या महासंमेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी ओबीसी नेते अल्पेश ठाकोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी राहुल गांधी पाटीदार अनामत आंदोलन समितीचे संयोजन हार्दिक पटेल यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

कॅटरिना कैफ झाली व्यस्त

कॅटरिना कैफचे शेड्यूल सध्या खूपच व्यस्त आहे. सलमान खानसोबत ती टायगर जिंदा है चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या एक था टायगर चा सिक्वल आहे. सध्या या चित्रपटाचे डबिंगचे काम सुरु आहे. याच सोबत अनेक ब्राँडसोबत सुद्धा कॅटरिना काम करते आहे.

त्याचसोबत शाहरुख खान स्टारर आनंद एल राय चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सुद्धा ती बिझी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७-२०१८ मध्ये येणाऱ्या तीन मोठ्या चित्रपटांचा कॅटरिना कैफ भाग बनणार आहे. या वर्षाच्या अखेरीस ख्रिसमध्ये  कॅट आणि सलमानच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. तब्बल पाच वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत. सलमान खान आणि कॅटरिनाच्या जोडीचा ‘टायगर जिंदा है’ कडून दोघांना ही खूप अपेक्षा आहेत. आबु धाबीमध्ये ४५ दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. रणबीरशी झालेल्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कॅटरिना सलमानच्या जवळ आल्याची देखील चर्चा होती. तब्बल यानंतर कॅट कबीर खानच्या चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मध्ये भारताला क्रिकेटमध्ये वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या टीमवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. यात ती  कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिका साकारणार आहे. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. त्यामुळे रणवीर आणि कॅटरिनाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.रणवीरच्या अपोझिट कॅटरिना कैफ कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारणार आहे. असे म्हटले जाते की, कपिल देव यांच्या यशात त्यांची पत्नी रोमीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यामुळे कॅटरिनाला रोमी यांची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक असणार आहे.

ईशाला कन्यारत्न

मुंबईः बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा आजी आजोबा झाले आहेत. त्यांची थोरली मुलगी ईशा देओल-तख्तानी हिने आज (२३ ऑक्टोबर) पहाटे गोंडस मुलीला जन्म दिला. ईशाला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचे आणि भरत तख्तानीचे हे पहिलेच बाळ आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात ईषाने ती गरोदर असल्याची गोड बातमी सर्वांना दिली होती. तिच्या मुलीच्या जन्माने हेमा मालिनी दुसऱ्यांचा आजी झाल्या आहेत. त्यांची लहान मुलगी आहाना हिने दोन वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. आहाना आणि तिचा नवरा वैभव वोहरा यांना डॅरियन हा मुलगा आहे.

याच महिन्यात पहिल्यांदाच आपल्या गर्भवती मुलीसोबत पोज देताना दिसले होते धर्मेंद्र….
ईशाने आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय केला. याकाळातील बरेच फोटोज तिने सोशल मीडियावरदेखील पोस्ट केले. पण वडील धर्मेंद्र यांच्यासोबतचा पहिलाच फोटो समोर आला होता. शिवाय ईशाने तिच्या सासूबाईंसोबतचासुद्धा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबत तिने लिहिले होते,

सप्टेंबर महिन्यात ईशाचे दोनदा डोहाळे जेवण झाले होते. या दोन्ही कार्यक्रमांचे फोटोज ईशाने तिच्या फॅन्ससाठी शेअरदेखील केले होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ईशाने जून २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत लग्न केले होते. लग्नानंतरही ईशाने काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, २०१५ पासून ती रुपेरी पडद्यापासून दूर झाली.‘किल देम यंग’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

महानायक रजनीकांत यांच्याकडून मर्सलचं कौतुक

चेन्नई : दाक्षिणात्य सिनेमातील महानायक अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांनी सुपरस्टार विजयच्या ‘मर्सल’ सिनेमाचं कौतुक केलं आहे. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला सिनेमातून हात घालण्यात आल्याचं रजनीकांत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.

‘मर्सल’ सिनेमातीलच काही संवादांवर तामिळनाडूतील भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. जीएसटी, डिजिटल इंडिया, नोटाबंदी या मुद्द्यांवरील संवादांवर तामिळनाडू भाजपने आक्षेप नोंदवत ते सीन कापण्यासाठी आक्रमक पवित्राही घेतला होता. त्यावरुन तामिळनाडूत मोठा वादंग माजला आहे.

आता सुपरस्टार रजनीकांत यांनीच सिनेमाचं कौतुक केले आहे.

‘मर्सल’ हा सिनेमा औषधांच्या माफियाराजवर भाष्य करतो. ‘सिगापूरमध्ये 7 टक्के जीएसटी असूनही आरोग्यसेवा मोफत आहे. मात्र भारतात  २८  टक्के जीएसटीनंतर आरोग्यसेवा मोफत नाही’, या संवादावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले असून, विजय आणि अॅटली या जोडीने ‘थेरी’ हा सुपरहिट सिनेमाही याआधी केला आहे. बॉक्सऑफिसवरही सध्या ‘मर्सल’ दमदार कमाई करताना दिसतो आहे.

बिल्कीस बानो प्रकरणातील दोषी डॉक्टर,पोलीस सेवेत नको : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली | बिल्कीस बानो प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचारी आणि डॉक्टर सेवेत नसावेत, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. याबाबत गुजरात सरकारने चार आठवड्यात त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

मे महिन्यात गुजरातमधील बिल्कीस बानोवरील सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात जणांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने १२ दोषींची जन्मठेप कायम ठेवली होती. तर कनिष्ठ न्यायालयाने सात आरोपींची केलेली सुटका रद्द ठरवत त्यांनाही दोषी ठरवले. यात पाच पोलीस आणि अरुण कुमार प्रसाद व संगीता कुमार प्रसाद या डॉक्टर दाम्पत्याचा समावेश होता. कर्तव्य न बजावणे आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवले होते.

बिल्कीस बानोने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी, अशी मागणी तिने केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान बानोच्या वकिलांनी दोषी डॉक्टर आणि पोलिसांना पुन्हा सेवेत घेतल्याचे कोर्टात सांगितले. यानंतर सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला प्रश्न विचारले. तुम्ही पाच पोलीस आणि दोन डॉक्टरांविरोधात शिस्तपालन समिती नेमली होती का, तुम्ही नेमकी काय कारवाई केली, असा प्रश्न विचारला. यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, दोषी पोलीस आणि डॉक्टरांनी याप्रकरणात शिक्षा भोगली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने पोलिसांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. बिल्कीस बानोने भरपाईसाठी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करावी, असे सांगितले.

गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. ३ मार्च २००२ रोजी अहमदाबाद येथील रणधिकपूर गावात राहणाऱ्या बिल्कीसच्या कुटुंबियांवर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात बिल्कीसच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. यावेळी जमावाने पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणाची सुनावणी गुजरातमध्ये झाल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येईल, त्यामुळे प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात घ्यावी, अशी विनंती बिल्कीस बानोने केली होती. शेवटी ऑगस्ट २००४ मध्ये सुप्रीम कोर्टाने हा खटला मुंबई हायकोर्टात वर्ग केला. याप्रकरणात हायकोर्टाने पाच पोलीस आणि डॉक्टर दाम्पत्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र या सर्वांनी आधीच चार वर्ष तुरुंगात काढल्याने त्यांची सुटका झाली होती.