कल्याण : फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कल्याणात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे.
डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या एकूण १२ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, मनसे कार्यकर्ते स्वतःहून महात्मा फुले चौक आणि रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाले.
काय आहे प्रकरण?
रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली १५ दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर काल मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह २५ ते ३० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.