इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मुंबईकरांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज भासत असून देशात मानसोपचाराची गरज असणाऱ्या शहरात मुंबई पहिल्या तर राज्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे. जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीनं हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई (३८ हजार ५८८), कोलकाता (२७ हजार ३९४), बंगळुरु (२४ हजार ३४८) या शहरांतील नागरिक सर्वाधिक मानसिक उपचार घेत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेत असल्याचंही या अहवलात म्हटलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. १० वर्षांच्या चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसोपचार घेण्यासाठी येतात. मात्र मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असल्याचंही यातून समोर येतं. सातत्याने होणारा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हा विकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं, जे. जे. रूग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. युसूफ माचिसवाला यांनी सांगितलं. पूर्वी वयस्कर लोकांमध्ये मनोविकारांची लक्षणं आढळायची. आता तरुणांमध्ये हे प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे या तरूणांमध्ये मनोविकाराबाबतची जागृती करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
फेसबुकमुळे येणारा तणाव, सायबरशी निगडीत समस्या आणि ऑनलाइन गेमच्या आहारी जाणं यासारखे काही नवीन विकार तरुणांमध्ये बळावताना दिसत आहेत. हे विकार यापूर्वी नव्हते. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिक विकाराचा सामना करणारी अनेक मुलं आमच्याकडे उपचाराला येतात, असं केईएमचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळेही अनेकांचं मानसिक खच्चीकरण होऊन त्यांना मानसिक आजारांना सामोरे जावं लागत आहे. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया यामुळेही लोकांच्या मानसिकतेवर आघात केला जात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार निर्माण झाले आहेत. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. त्याला मुंबईकरांची जीवनशैलीही कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
मानसोपचार घेणारी राज्यं
पश्चिम बंगाल ( २ लाख ७५ हजार ५७८)
महाराष्ट्र (१ लाख २४ हजार ४००)
कर्नाटक (१ लाख १६ हजार ७७१)
नव्याने निर्माण झालेले विकार
फेसबुक डिप्रेशन
सायबर बुलिंग
ऑनलाईन गेम अॅडिक्शन
बॉडी इमेज इश्यू