मुंबई : नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातला प्रवेश आता जवळपास निश्चित झाला आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनीही त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले आहेत.
नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचा विरोध हा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया दिली. आज ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
दुसरीकडे नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची संभाव्य तारीखच चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर करुन टाकली. त्यामुळे आतापर्यंत भाजपमधले दिग्गज नेते अशी ओळख असलेल्या खडसेंपेक्षा काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपला जवळचे झाले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या संवादासाठी बैठकीची गरज नाही
उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही, आम्ही योग्यरितीने संवाद साधतो, आम्हाला मध्यस्थांची वा बैठकांची गरज भासत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच मी कपटी मित्र कुणालाही म्हटलं नाही आणि आमच्या मित्राला तर नाहीच नाही, असंही स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.
काहींना टीका करण्याची सवय
सरकारच्या सर्व निर्णयावर टीका करण्याची मित्रपक्षाच्या काही नेत्यांना सवय आहे. सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करायची, विरोधकांची भूमिका पार पाडायची, त्याचवेळी स्वपक्षाकडून शाबासकी मिळेल अशी अपेक्षा असते, मात्र ही भूमिका योग्य नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शिवसेनेसोबत योग्य समन्वय
शिवसेनेसोबत आमचा योग्य समन्वय आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने निर्णय घेतो. केवळ थेट सरपंच निवडीला शिवसेनेने विरोध केला. त्यावेळी बहुमत घेण्यात आलं. मात्र तो निर्णय वगळता, सर्व निर्णय एकमताने घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले.
म्हणून राष्ट्रवादीशी संवाद
विधानपरिषदेत राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे. त्यामुळे एखादा कायदा पास करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते. शिवसेनेमुळे राष्ट्रवादीला जवळ करतोय असं अजिबात नाही, विधान परिषदेत आमचं बहुमत नाही, त्यामुळे संवाद ठेवण्याची गरज असते. राजकीय समन्वय साधून संवाद ठेवावा लागतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मिलिंद नार्वेकर भला माणूस, पण माझे इतके वाईट दिवस नाहीत
नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी शिवसेनेने अल्टिमेटम दिल्याच्या बातम्यांबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “माध्यमात अशा बातम्या कुठून येतात समजत नाही. शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर चिठ्ठी घेऊन अल्टिमेटम देतात अशा बातम्या येतात. पण उद्धवजी आणि माझ्यात चांगला संवाद आहे. मिलिंद नार्वेकर माझ्याकडे प्रस्ताव घेऊन येतील इतके माझे वाईट दिवस नाहीत. अर्थात मिलिंद नार्वेकर भला माणूस आहे, पण माझ्यावर अजून तशी वेळ आलेली नाही, अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली.