मुंबई – दिल्लीप्रमाणे आता मुंबई शहरही महिलांसाठी असुरक्षित बनत चालले आहे. छेडछाडीचा जाब विचारला म्हणून अल्पवयीन मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता विक्रोळीमध्ये एका विवाहित महिलेवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. पीडित महिला विक्रोळीच्या तिच्या ऑफीसमध्ये असताना आरोपी सावीर हसन मोहम्मद खान तिथे आला व त्याने वाद घालायला सुरुवात केली.
पीडित महिला सावीरला खेचून ऑफीसमधून बाहेर काढत असताना सावीरने त्याच्या जवळच्या चाकू काढला व महिलेवर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला 33 टाके पडले आहेत. तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावीर खान वाकोला येथे राहतो. एकतर्फी प्रेमातून त्याने हा हल्ला केला. काही दिवसांपासून सावीर या महिलेला व्हिडीओ क्लिप्सवरुन ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्थानिकांनी पकडून हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. कलम ३०७ आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित महिलेने एकत्र काम केले होते. त्यावेळी आरोपी तिच्या प्रेमात पडला होता.