skip to content
Friday, May 24, 2024
Homeमनोरंजन‘मर्सस’ने तीन दिवसांत १०० कोटी कमावले!

‘मर्सस’ने तीन दिवसांत १०० कोटी कमावले!

साऊथचा अभिनेता विजय याचा ‘मर्सस’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे.  राजकीय गोटातील वातावरण तापवणा-या या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी आहे. होय, अनेक वादानंतर बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने धमाका केला आहे. पहिल्या दिवशी ‘मर्सस’ने ४३.३ कोटी कमावले होते आणि ट्रेड रिपोर्ट्स खरे मानाल तर अधिकृतरित्यान तीन दिवसात या चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे.

एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, ‘मर्सस’सोबत विजयचे चार चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. ‘थुप्पक्की’, ‘काथी’, ‘ठेरी’ आणि आता ‘मर्सस’ हे ते चार चित्रपट. विजयच्या ‘मर्सस’ने सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ आणि अजीत कुमारच्या ‘विवेगम’चा विक्रमही मोडीत काढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही हा चित्रपट चांगली कमाई करतो आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाने दहा कोटींचा आकडा पार केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वादात सापडला होता. सध्या या चित्रपटातील जीएसटीशी संबंधित एक सीन सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. या सीनमध्ये चित्रपटाचा हिरो विजयच्या तोंडी एक डायलॉग आहे. ‘सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी आहे. तरिही तेथे मोफत औषधे मिळतात. याऊलट भारतात औषधांवर १२ टक्के जीएसटी आहे आणि अल्कोहोलवर कुठलाच जीएसटी नाही,’ असे विजय यात म्हणतो. या सीनमध्ये विजय गोरखपूरच्या ट्रॅजेडीवरही बोलताना दिसतो आहे. हा सीन चित्रपटातून गाळण्याची मागणी भाजपाने केली होती. यावरून राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व अन्य विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर यानिमित्ताने टीका केली होती. या जीएसटी सीनवरून चित्रपट वादात सापडल्यानंतर ‘मर्सस’च्या निर्मात्यांनी हा सीन चित्रपटातून गाळण्याची तयारी दर्शवली आहे. त्यापूर्वी प्रोड्यूसर्स गिल्ड आॅफ इंडियाशी संबंधित प्रोड्यूसर सिद्धार्थ राय कपूर यांनी ‘मर्सस’च्या निर्मात्यांचा बचाव केला होता. आम्ही सेन्सॉर बोर्डाचे अभिनंदन करतो, जे ‘मर्सस’च्या निर्मात्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चित्रपटातील पात्राने मांडलेले वेगळे विचार चित्रपटात कायम ठेवण्याची परवानगी सेन्सॉर बोर्डाने दिली, हे अभिनंदनास पात्र आहे, असे सिद्धार्थ राय कपूर म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments