मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात ८ ते ९ रिक्षांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षांची तोडफोड झाल्याचं रविवारी सकाळी समोर आलं.
कुर्ल्यातील शेल कॉलनी परिसरात नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला रिक्षा पार्क केलेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी या रिक्षांची तोडफोड केली आहे. सकाळी रिक्षा चालकांना आपल्या रिक्षा तोडफोड झालेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्या. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडफोडीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे रिक्षावाल्यांचं मोठं नुकसान झालं आहे.आतापर्यंत पुणे आणि पिंपरी परिसरात असलेलं वाहन तोडफोडींचं लोण मुंबईतही पसरल्याचं चित्र आहे. योगायोग म्हणजे, याच परिसरात दोन दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली होती.