ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणास सुरूवात झाली असून ठाणे महापालिका हद्दीत अवघ्या तीन दिवसात एकूण 4000 हून अधिक नागरिकांनी लसीकरण करुन घेतले. यात 60 वर्षावरील एकूण 3599 ज्येष्ठ नागरिकांचा तर 45 ते 60 वयोगटातील 615 नागरिकांचा समावेश आहे, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद हा प्रेरणादायी असल्याबाबत महापौरांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे अभिनंदन करुन जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.
आज महापौर नरेश म्हस्के यांनी हाजुरी आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र व मेंटल हॉस्पिटल येथील आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती निशा पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका मीनल संख्ये, माजी नगरसेविका नम्रता भोसले- जाधव उपस्थित होत्या.
ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहू लागू नये तसेच गर्दी होवू नये यासाठी लसीकरणाची केंद्रे वाढविण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले होते, त्यानुसार नवीन लसीकरण केंद्रे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरू केली, त्याचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला असून ठाण्यात आजमितीला 25 लसीकरण केंद्रे सुरू आहेत. या सर्व लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था व पाण्याची सोय करण्यात यावी, तसेच काही आरोग्य केंद्रावर त्रुटी असल्यास त्या ही दूर कराव्यात असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा: शुक्रवारपासून मुंब्रा – भिवंडी मार्गावरही धावणार परिवहनच्या बसेस
केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 60 वर्षे पुर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही असे आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी लसीकरण मोहिमेस सुरूवात झाली आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील सर्वच आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या डोससाठी तर 60 वर्षावरील एकूण 3599 ज्येष्ठ नागरिकांनी तर 45 ते 60 वयोगटातील एकूण 615 नागरिकांनी लस घेतली आहे. तसेच या वयोगटातील नागरिकांना काही आजार असल्यास त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईनवर काम करणारे आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा एकूण 29 हजार 124 कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर आतापर्यत 6670 कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीचा दुसरा डोस देखील पूर्ण झाला आहे. एकूणच ठाणे शहरात लसीकरणासाठी ठाणेकरांचा चांगला सहभाग मिळत असून या सर्व नागरिकांचे महापौर नरेश म्हस्के यांनी कौतुक केले असून सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन देखील केले आहे.
खाजगी रुग्णालयांमध्येही होणार लसीकरण
लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सिध्दीविनायक हास्पिटल, वेदांत हॉस्पिटल, वर्तकनगर, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, प्राईम होरायजन पातलीपाडा, हायवे हॉस्पिटल लुईसवाडी, पिनॅकल आर्थोकेअर हॉस्पिटल चंदनवाडी, हायलॅण्ड हॉस्पिटल ढोकाळी, कौशल्य हॉस्पिटल पाचपाखाडी, काळसेकर हॉस्पिटल मुंब्रा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून येत्या दोन दिवसात या ठिकाणी लसीकरणास सुरूवात होणार आहे.