राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी कुख्यात गुंड बाबाजी उर्फ सुभाष सिंग ठाकूर याला सुपारी दिल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यानंतर त्यातील आवाज हा ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या आवारात महेश आहेर यांना मारहाण केली होती.
त्यानंतर, जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे आरोपांच्या फैरी झाडत महेश आहेर यांच्या केबिनमध्ये एक व्यक्ती नोटांचे बंडल मोजत असल्याचं व्हिडीओ ट्विट केला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये महेश आहेर हे त्यांच्या केबिनमध्ये एका व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देताना दिसत आहेत.
वायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये महेश आहेर हे अन्य दोघांबरोबर संभाषण साधत जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख नाग असा करून त्यांना ठेचण्याची भाषा करत आहेत.
ह्या ऑडिओ क्लीपमध्ये महेश आहेर म्हणत आहेत कि, ” पोलीस कमिशनर, एकनाथ शिंदे यांच्याकडे मी रेकॉर्ड पाठवून ठेवलेत कि आव्हाड माझा कधीही मर्डर करेल, माझ्याविरोधात काहीही करू शकेल. मी हे बॅकग्राऊंडला क्रिएट करून ठेवले आहे. जितेंद्र आव्हाड हा नाग आहे आणि मला त्याला ठेचायचा आहे.”
बाबाजी नामक कुख्यात गुंडाकडे आव्हाड यांच्या मुलीची आणि जावयाची सुपारी स्पेनमध्ये दिली असल्याचेही या ऑडिओ क्लिप मधून समोर आले आहे.
ते पुढे म्हणाले कि, ” मी आमचे शूटर बाबाजीला सांगून स्पेनमध्ये लावले आहेत… त्याचा जावई ठाण्यात आला नाही तर त्याचा बापावर अटॅक केल्यावर तो एक दिवसासाठी ठाण्यात येईल.. मी एअरपोर्ट पासून फिल्डिंग लावेल.. त्याची गेम करणार. त्याच्या ( जितेंद्र आव्हाड) पोरीला रडायला लावणार म्हणजे कळेल त्याला पोरीचं दुःख काय असतं..”
हि ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेच्या आवारात मारहाण केली होती. याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: MLA Jitendra Awhad made serious allegations against Municipal officer Mahesh Aher