ठाणे: परिवहन सेवेच्या माध्यमातून ठाण्यातील नागरिकांसाठी विविध मार्गावर बससेवा सुरू आहेत. सर्वच विभागातून भिवंडीकडे नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या मार्गावर परिवहनच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी सातत्याने होत होती, ही मागणी लक्षात घेवून परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून उद्या 5 मार्चपासून मुंब्रा पोलीस ठाणे ते शिवाजी चौक भिवंडी मार्ग क्र. 84 या मार्गावर वर नव्याने परिवहनच्या बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली.
मागील काही वर्षात ठाण्याबरोबरच मुंब्रा दिवा विभागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ठाण्याअंतर्गत दळणवळणाची व्यवस्था व्हावी यासाठी परिवहनच्या माध्यमातून विविध मार्गावर बससेवा सुरू आहेत. भिवंडी येथे अनेक उद्योगधंदे असून ठाण्याच्या सर्वच भागातून नागरिक येथे दैनंदिन ये-जा करीत असतात.
हेही वाचा: …मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी का नाही?; आशिष शेलारांचा खोचक सवाल
या पार्श्वभूमीवर मुंब्रा विभागातील नागरिकांना दैनंदिन वाहतूकीची व्यवस्था व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू अशरफ पठाण व परिवहन समिती सदस्य शमीम खान व बालाजी काकडे यांनी परिवहन समितीकडे केली होती. या मागणीचा विचार करुन प्रायोगिक तत्वावर मार्ग क्र. 84 वर बससेवा 5 मार्चपासून सुरू होत असल्याची माहिती सभापती विलास जोशी यांनी दिली.
या बससेवेअंतर्गत मुंब्रा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक [भिवंडी] मार्ग क्र. 84 एकूण बसफेऱ्या 20 असून 07.00, 07.30, 08.00, 08.30, 09.00, 10.00, 10.40, 11.10, 11.40, 12.10, 14.50, 15.20, 15.50, 16.20, 16.50, 18.00, 18.30, 19.00, 19.30, 20.00 तर शिवाजी चौक [ भिवंडी ]ते मुंब्रा पोलीस स्टेशन मार्ग क्र. 4 येथून एकूण 20 फेऱ्या असून 08.20, 08.50, 09.20, 09.50, 10.20, 11.30, 12.00, 12.30, 13.00, 13.30, 16.10, 16.40, 17.40, 18.10, 19.20, 19.50, 20.20, 20.50,21.20 या वेळेत या बस धावणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.