मुंबई : मोठा गाजावाजा करून लक्ष्मीपूजनाच्या आधी शेतकऱ्यांच्या घरी लक्ष्मी येईल अशी गर्जना करणारं राज्य सरकार तोंडघशी पडलंय. कर्जमाफीला घाई झाल्याने चूक झाली अशी प्रांजळ कबुलीच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
“देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी प्रामाणिक कर्जमाफी” अशी जाहिरातबाजी करून दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीला सुरुवात केली. लक्ष्मीपूजनाच्या आधी जवळपास 8.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असा दावा सरकारने केला होता. पण दुसऱ्या दिवसापासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाही.
आपल्या आग्रहाखातर शेतकऱ्यांना दिवाळी सुखाची जाओ त्यासाठी प्रमाणपत्र देण्यात आलं. कर्जमाफीला घाई झाल्याने चुका झाल्यात अशी कबुली सुभाष देशमुख यांनी दिली.
कर्जमाफीची यादी ही साडे आठ लाखाची यादी आहे. अनेक ठिकाणी एकाच आधार कार्डवर आहे. त्यासाठी तात्काळ आज बँकांशी बैठक बोलावली आहे. आता जे जे क्लिर आहेत त्या शेतकऱ्यांना उद्यापासून पैसे जमा होतील. शेतकऱ्यांनी बरोबर माहिती दिली आहे. पण आमच्याकडून घाई झाल्यामुळे हा घोळ झालाय अशी कबुली देत शेतकऱ्यांचा एकही पैसा वाया जाणार नाही अशी ग्वाहीही देशमुख यांनी दिली.