अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन भारत दौऱ्यावर आले असून, बुधवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.
नवी दिल्ली: दहशतवादावरुन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत असून, यामुळे पाक सरकारलाही धोका निर्माण झाला आहे, असे रेक्स टिलरसन यांनी सांगितले. तर पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कारवाई केल्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे दहशतवादविरोधी धोरणाला यश मिळणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन भारत दौऱ्यावर आले असून, बुधवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण, तंत्रज्ञान, दहशतवाद अशा विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ‘मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी दृढ झालेत, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांवरुन दहशतवाद्यांचे आश्रयस्थान अजूनही सुरक्षित असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्वराज यांनी म्हटले आहे. भारत, अफगाणिस्तान आणि अमेरिका या देशांमध्ये डिसेंबरमध्ये बैठक होईल, असे त्यांनी जाहीर केले. अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांच्या एच १ बी व्हिसावर चर्चा झाल्याचे स्वराज यांनी सांगितले.
अफगाणिस्तान – अमेरिका धोरणात भारत महत्त्वाची भूमिका निभावणारा देश आहे. दक्षिण आशियातील भारताच्या नेतृत्वाला अमेरिकेचा पाठिंबा आहे, असे टिलरसन यांनी सांगितले. पाकिस्तानमधील नेते आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, आमच्या अपेक्षाही पाकिस्तानला सांगितल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. आम्हाला पाकिस्तानसोबत काम करायचे आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी अमेरिका सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.