सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मा हिच्या घरी दिवाळीच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बऱ्याच सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली. शाहरुख खानपासून ते करण जोहर, कतरिना कैफ अशा खास मंडळींनीसुद्धा या पार्टीच उपस्थिती दर्शवली होती. खुद्द सलमाननेसुद्धा पाहुण्यांचं आनंदाने स्वागत करत होता. सलमानच्या बहिणीची पार्टी म्हटल्यावर सेलिब्रिटींची गर्दी होणार हे अपेक्षित होतच. पण, या गर्दीत एका अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं. ती अभिनेत्री म्हणजे सलमानची खास मैत्रिण कतरिना कैफ.
सलमानची खास मैत्रिण म्हणण्यामागचं कारण असं की, एकेकाळी कॅट आणि दबंग खान रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जायचं. सलमानच्या घरी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध समारंभांनासुद्धा कतरिना हजेरी लावायची. पण, अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला. प्रेमाचं नातं तुटलं असलं तरीही त्यांच्यातील मैत्रीचं नातं आजही टिकून आहे. किंबहुना हे नातं आणखीनच दृढ होताना दिसतंय. याचाच प्रत्यय या दिवाळी पार्टीत आला.
पार्टी संपल्यानंतर ज्यावेळी कतरिना घरी जायला निघाली तेव्हा सलमानने तिला एकटीला जाऊ दिलं नाही. तिच्या संरक्षणासाठी त्याने आपल्या सर्वात खास अंगरक्षकाला म्हणजेच शेराला पाठवलं. त्यानंतर शेराने कतरिनाला तिच्या कारपर्यंत सोडलं. पार्टीतून सेलिब्रिटी बाहेर पडतात तेव्हा त्यांचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकारांची प्रचंड गर्दी होते. कधीकधी तर कलाकारांच्या अंगरक्षकांनासुद्धा ही गर्दी आवरली जात नाही. त्यामुळे अशा कोणत्याच अडचणीचा सामना कतरिनाला करावा लागू नये, यासाठीच सलमानने तिच्यासोबत शेराला पाठवल्याचं म्हटलं जात आहे. सलमानच्या या खास अंगरक्षकाविषयी सांगायचं झालं तर, शेरा मागील १८ वर्षांपासून सलमानचा अंगरक्षक म्हणून काम पाहत आहे. तो नेहमीच सलमानसोबत त्याच्या सावलीप्रमाणे वावरत असतो. त्यामुळे चित्रपटसृष्टीत शेरालासुद्धा बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. सलमान त्याला आपल्या कुटुंबातील एक सदस्यच मानतो.