Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराजकीय गुंडगिरी!

राजकीय गुंडगिरी!

शाहु,फुले,आंबडेकरांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात राजकीय पक्ष तलवारबाजी, हल्ले करण्याचे काम करत असतील तर हि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. फेरीवाल्यांची बाजू घेतल्या प्रकरणी मनसेच्या काही हल्लेखोरांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करुन तोडफोड केली. खरतर मनसे हा राजकीय पक्ष आहे की गुंडांची टोळी असा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला आहे. विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे असे आपण नेहमीच बोलतो परंतु ते कृतीतून होतांना दिसत नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी,व फेरीवाल्यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांवर हल्ले केले होते. मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी सांगितले होते जर लाठ्या निघत असतील तर महाराष्ट्राला तलवारीचा इतिहास आहे हे विसरु नये. हा इशारा परप्रांतीय फेरीवाल्यांना आणि त्यांची बाजू मांडणाऱ्या नेत्यांना दिला होता. काही दिवसापूर्वी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका कार्यक्रमात उत्तरभारतीय लोक हे मुंबईची शान आहे असा गौरवोद्गार काढला होता. त्यानंतर मनसेकडून महाजन यांच्यावर कडाडून टीका झाली होती. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका कार्यक्रमात उत्तरभारतीयांचे मुंबईला मोठे योगदान लाभले असल्याचे विधान केले होते. त्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना ‘भैय्या’ पुरस्कार मिळू शकतो अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. खरतर राज्यात,देशात  महागाई,नोकरी,बेरोजगारी,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,महिलांवरील अत्याचार,चोऱ्या,असे अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या विषयावर राजकीय पक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु मतांच्या राजकारणासाठी प्रांतवादावरुन वाद निर्माण करणे हे महाराष्ट्राच्या ऐतिहासीक राज्याला न शोभणार आहे. काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर संदीप देशपांडे यांनी ट्विट करून या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..’ असे ट्विट त्यांनी केले होते. काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा जाळून या हल्ल्याचा निषेध नोंदवला.  या हल्ल्यावर मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली की. ‘मनसेच्या नपुंसक कार्यकर्त्यांनी जेव्हा ऑफिसमध्ये कुणीच नव्हतं तेव्हा हल्ला केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई नाही केली तर मनसेला सडेतोड उत्तर दिलं जाईल’, असे ट्विट त्यांनी केले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, गुरुदास कामत,जितेंद्र आव्हाड,अशोक चव्हाण,सचिन सावंत,यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे कसे तीनतेरा झाले यावरही टीका केली. जर राजकीय पक्षाची मंडळीच गुंडांसारखे हल्ले करत असतील तर जनतेने काय करायचे असा प्रश्न उपस्थित होतो. सरकार जो पर्यंत कडक पाऊले उचलत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात असाच राजकीय गुंडांचा नंगानाच चालत राहिल. याला जरब बसावी म्हणून राजकारण बाजूला करुन सरकारने कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. हीच अपेक्षा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments