Thursday, June 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकार्यकर्त्यांनों सावधान! प्रसाद तुम्हाला... मलाई नेत्यांना - मुंबानगरी की राडानगरी?

कार्यकर्त्यांनों सावधान! प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी?

shiv sena, bjp, clash, dadar, sena bhavan
Image: PTI

कालच्या घटनेने मी पूर्णतः अस्वस्थ झालो आहे, राजकारणात नसलेल्या आम आदमीची ही हीच अवस्था आहे, काल दादर मध्ये शिवसेना भवनासमोर झालेल्या हाणामारी मुळे मुंबईत कोण आणि काय साध्य करू इच्छित आहे, यासारखे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत, कालच्या घटनेमुळे आर्थिक राजधानी असलेल्या शहराचे रूपांतर फ्री स्टाईल शहरामध्ये अवतरीत झाले आहे.

कालच्या हिंसक घटनेनंतर अनेक शिवसेना नेत्यांनी आपल्या व्हाट्सअप्प, फेसबुक आणि ट्विटर  वॉलवर स्वर्गीय बाळासाहेब यांचे ते “कोणी फाडकन वाजविली तर आपण काडकन वाजवायची” असे स्पीच टाकले, मुंबईच्या महापौर यांनी सुद्धा हे स्पीच आपल्या फेसबुक आणि ट्विटर वर टाकले, ऐका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने मारामारीचे असे खुलेआम समर्थन केल्यामुळे महाराष्ट्र नेमका कुठे नेवून ठेवला आहे? ही खंत निर्माण झाली आहे, जर प्रत्येक जबाबदार व्यक्तीने प्रत्येक मुद्यासाठी असे समर्थन केले तर महाराष्ट्राचे बिहार कधी होईल हे कळण्याच्या आतच हातातून वेळ निघून गेलेली असेल.

त्यावेळी बाळासाहेबांनी जे स्पीच दिले त्यावेळची परिस्थिती भिन्न होती, त्यावेळी बाळासाहेबांसाठी जीव द्यायला ही लोक तयार होती,आता विचारा शिवसेना नेत्यांना की उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोण जीव देतो? आत्ताचे नेते स्वार्थी, सत्तेसाठी लाचार झाली आहेत फक्त नेत्यासमोर स्टंट करून दिखावा केला जातो. अश्या कुठल्याही हिंसक गोष्टीचे समर्थन होऊ शकत नाही,विषय हा नाही जे काल झाले यावरून महाराष्ट्रात शिवशाही आहे की ठोकशाही की मोगलाई? भाजपच्या नेत्यांनीही कालच्या घटनेचे विवरण संविधानिक भाषेचा वापर न करता केलेले आहे, त्यांनीही ठोश्यास ठोसा देऊ, ईट का जवाब पथर से देंगे असे माथे भडकविण्याचे स्टेटमेंट दिले आहेत, मग कार्यकर्त्याला आपले डोके थोडे आहे समजून घ्यायला, आपल्या नेत्यांने सांगितले हे सत्यवचन समजून रस्त्यावर येतात आणि दोन गट समोरासमोर आलेत की आतला मर्द जागा होतो आणि मग मारामारी सुरू होते, मग आपल्याच भावाचे डोके फोडले जाते, माझे शिवसेना आणि भाजप बरोबरच इतर पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना विनंती आहे एकमेकांशी भांडू नका,डोकी फोडू नका, पोलीस केस फक्त तुमच्यावरच होतील (नेत्यावर नाही) उद्या ह्यांची युती झाली तर तुमचे हेच नेते तुम्हाला वाऱ्यावर सोडून खुर्च्या उबवतील ! तुम्हाला ह्या हाणामारीतून काही झाले तर तुमचा परिवार, तुमची लेकरे रस्त्यावर येतील, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, आपला बाप देश स्वातंत्र्याच्या लढाईत शहिद नाही तर राजकारणाने प्रेरित हाणामारीत मेला हे दुःख अधिक होईल, एक महिन्यानंतर तुमच्या छोट्या या मोठ्या बालबच्यांकडे तुमचा हा नेता ढुंकूनही बघणार नाही, त्यावेळी तुमच्या आईला आणि पत्नीला नागडे सत्य कळेल माझा मुलगा, माझा नवरा फुकट मेला,असे दुःख देणार आहात का तुम्ही तुमच्या भरलेल्या परिवाराला हा प्रश्न आहे? उत्तर द्या, फक्त एक दिवस तुमचा नेता सात्त्वनासाठी तुमच्या घरी येईल, दोन दिवस तुमच्या घटनेच्या आड त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजली जाईल, मीडिया मध्ये त्यांच्याकडून अश्या प्रकारे आव आणला जाईल,जसे की त्यांच्या सख्या भावाचे नुकसान झाले आहे, कधी स्विकाराल तुम्ही हे सत्य?

माझा सरकारला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे, सरकार या नात्याने आपल्याच कार्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्ष या नात्याने तुमच्या कार्यकर्त्यांनी असे केल्याचे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना कालची हिंसक घटना मान्य आहे का? फक्त कार्यकर्ता रस्त्यावर उतरून मरतो आहे की आपल्या अंगाला एक छोटी जखमही होत नाही म्हणून समर्थन करता आहेत? आंदोलनाच्या नावाखाली चाललेले असे हिंसक कृत्ये आम आदमीला कदापी मान्य नाही.

नाशिक मध्ये पंधरा दिवसाआधी जितेंद्र भावे यांनी ऐका तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले तरी तुमच्या पोलीस प्रशासनाने त्यांना कायदा शिकविला, मग येथे तर तुमच्या आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी पोलिसांसमोरच कायदा हातात घेतला आहे, तर आता कोणता कायदा लावणार आहेत, याची आम आदमीला प्रतीक्षा आहे.

काय झाले काल?

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळाल. मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्याब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळाले, शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनांही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला, अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला होता, भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपचा आरोप काय

अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या शुल्लक राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे, हा तीव्र निषेध भाजप शिवसेना भवन समोर करत आहे, असं भाजप युवा मोर्चाने म्हटलं आहे.

शिवसेनेची मागणी काय?

राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको.श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आलं आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments