बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हिंदी सैराटचं कास्टिंग अखेर जाहीर झालं असून त्यात आर्चीची भूमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तर परशाच्या भूमिकेत शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर दिसणार आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी ‘सैराट’ चित्रपटाने अनेक विक्रम मोडित काढले. सैराटच्या या यशाने फक्त मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली. बॉलिवूडचा प्रख्यात दिग्दर्शक करण जोहरने हिंदी सैराटचे हक्क विकत घेतलेत. पण या हिंदी सैराटमध्ये प्रमुख भूमिका नेमकं कोण साकारणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. तोच सस्पेंस अखेर संपला असून लवकरच तो सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मराठी सैराटमध्ये रिंकू राजगुरुने साकारलेली आर्ची प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली होती. तिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही मोहर उमटवली होती. तर आकाश ठोसरने परशाची व्यक्तिरेखा गाजवली होती. सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर छळकणार हे खरंतर याआधीच जगजाहीर झालं होतं. परशाच्या भूमिकेबाबत मात्र, अगदी काल परवापर्यंत सस्पेंस कायम होता. पण आता तो सस्पेंसही मिटलाय. शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर याचं नाव परशाच्या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आलंय. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरुन यासंबंधीची माहिती दिली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून हिंदी सैराटचं शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट १८ वर्षांच्या जान्हवीचा ‘डेब्यू’ आहे. २२ वर्षीय इशान मात्र माजिद माजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड्स’मध्ये झळकला होता. उडता पंजाबमध्येही त्याने लहानशी भूमिका केली होती. दरम्यान, आर्चीच्या भूमिकेसाठी जानव्ही सूट नसल्याची प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीत उमटली होती. कारण जानव्ही ही पूर्णतः शहरी वातावरणात वाढलेली असून तिचा लूकही पूर्णपणे मॉर्डन मुलीचा आहे. याउलट मराठी सैराटमधली आर्ची ही अकलूजसारख्या ग्रामीणभागात वाढलेली असून तिचा लूकही खेड्यातल्या मुलीसारखा होता. कदाचित म्हणूनच करण जोहरने नागराज मंजुळेला हिंदी सैराटचं दिग्दर्शन करण्यासाठी विचारल्यावर त्याने नम्रपणे नकार दिल्याचं बोललं जातंय.