मुंबई – शिवसेना सत्तेत असली तरी भाजपला अडचणीत आणायचा एकही मुद्दा सोडत नाही. या वेळी तर शिवसेनेने थेट भाजप मंत्र्यांनाच लक्ष्य केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मंत्र्यांवर जे घोटाळ्याचे आरोप झाले. त्या मंत्र्यांवर काढलेली पुस्तिकाच पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार खासदार यांच्यासह सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुखही उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. या दृष्टीनेच या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनाच भाजपच्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांच्या संदर्भातील पुस्तिका दिल्याची माहिती मिळत आहे. या पुस्तिकेत शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मंत्र्यांची छायाचित्रेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. या पुस्तिकेत केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील भाजप नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही उल्लेख करण्यात आला आहे.