औरंगाबाद – दोन भरधाव वाहनांची समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातात २ जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात आज सकाळी नाशिकरोडवरील वरझडी फाट्याजवळ घडला. सर्व जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
अमृता किशोर बुंदेलवार (वय ३२, रा. जोगेश्वरी प.मुंबई), वाहन चालक अबू आबेद अशी मृतांची नावे आहेत. किशोर अशोक बुंदेलवार(वय ४०,रा. जोगेश्वरी ,मुंबई), वसंत बाळा तुरे (वय ५८, इंदूबाई बाळा तुरे (५०), शोभा वसंत तुरे (५२), सुमानबाई शिरसाठ( ४५), सारंग वसंत तुरे (३३, सर्व राहणार मयुरपार्क, जाधववाडी) अशी दोन्ही वाहनातील जखमींची नावे आहेत.
या अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, किशोर हे चंद्रपूरहुन मुंबईकडे जात होते. त्यांच्या चारचाकी मध्ये पत्नी अमृता आणि चालक अबू आबेद त्यांच्या सोबत जात होते तर दुसऱ्या चारचाकी मध्ये सागर तुरे हे परिवारासह येवल्याहून औरंगाबादला येत होते. औरंगाबाद नाशिक रोड वरील वरझडी फाट्यावर आज सकाळी दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरचा भाग चुराडा झाला.
किशोर यांच्यामागे बसलेली त्यांची पत्नी अमृता व चालक हे दोघेही जागीच ठार झाले .तर दुसऱ्या वाहणामधील तुरे परिवारातील पाच जण गंभीर जखमी झाले . अपघातानंतर परिसरातील काही नागरिकांनी तात्काळ ही माहिती फोन वरून पोलिसांना दिली. पोलिस आणि नागरिक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनातून घाटी रुग्णालायत दाखल केले .