नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून लवकरच ५०० पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनची गती वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास १५ मिनिटापासून ते तीन तासाने कमी होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
हे नवं वेळापत्रक नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार असून, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी करण्यात येईल. या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, प्रत्येक रेल्वे मंडलांना अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दोन ते चार तासाचा वेळ देण्यात येणार आहे. तसेच, ज्या ट्रेन रेल्वे स्थनकात थांबून आहेत, त्यांचा अधिकाधिक वापर करण्यावर रेल्वेचा भर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अंतर्गत सुरुवातीला ५० ट्रेन अशाप्रकारे चालवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
रनिंग टायमिंगमध्ये कपात
या नव्या वेळापत्रानुसार, सुरुवातीला ५१ एक्स्प्रेसच्या रनिंग टायमिंगमध्ये १५ मिनिट ते ३ तास कमी कपात येईल. यानंतर रनिंग टायमिंगमध्ये कपात करण्याची संकल्पना ५०० एक्स्प्रेस ट्रेनसाठी लागू करण्यात येईल.
५० मेल एक्स्प्रेसचं रुपांतर सुपरफास्टमध्ये
दरम्यान, सध्या रेल्वेचं अंतर्गत ऑडिट सुरु असून, यामध्ये ५० मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनचं रुपांतर सुपरफास्टमध्ये करण्यात येत आहे. सद्यस्थितीतील ट्रेनचा वेग वाढवण्याच्या तंत्राचा हा एक भाग असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
वेळेच्या बचतीसाठी रेल्वेने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, ज्या स्थानकात प्रवाशांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणचा थांबा रेल्वे मंत्रालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेनची गती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी ट्रॅक आणि इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्यात येणार आहे. त्याशिवाय ऑटोमॅटिक सिग्नलिंग आणि नव्या हॉफमॅन बुश कोचेस् लिंक करण्यात येईल. या कोचमुळे प्रत्येक ट्रेन ताशी १३० किमी वेगाने धावू शकेल. तसेच, रेल्वे पर्मनंट स्पीड रिस्ट्रक्शन प्रोसेसचाही रिव्ह्यू घेतला जात आहे.