कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईमध्ये कार्यरत होते. पण कोल्हापूरमध्येही राज्याचे मुख्यमंत्री आज आले होते. अजब वाटलं ना. पण होय कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं आज एक आंदोलन केलं आणि त्याच आंदोलनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आले होते. त्याचं झालं असं की, कर्जमाफीच्या मुद्यारुन आजही कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं. गेल्या २ महिन्यांमधलं हे तिसरं आंदोलन होतं आणि आज तर शिवसेनेनं आपल्या आंदोलनात प्रतिकात्मक मुख्यमंत्री आणले होते.
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आपल्या वाहनातून उतरतात त्याप्रमाणे हेही मुख्यमंत्री उतरले त्यानंतर महिला शिवसैनिकांनी त्यांचं औक्षणंही केलं. आणि याच प्रतिकामत्मक मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रंही वाटली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शिवसेननं आज सहकार खात्याच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाही केली. शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चाही कोल्हापूरमध्ये सुरू आहे.