औरंगाबाद – बँक, एटीएममध्ये ग्राहकांना आमिष दाखवत १ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या २ घटनांतील मोरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या पोलिसांनी उल्हासनगरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटना शहरात ९ ऑक्टोबर रोजी घडल्या होत्या.
ही टोळी गड्डी गँग म्हणून ओळखली जाते. अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर देविदास अंभोरे (वय २४) असे आहे. समर्थनगर येथील एका बँकेतून ९ ऑक्टोबरला शेख अल्ताफ सत्तार याच्याकडून खऱ्या नोटा असलेली ४८ हजाराची रक्कम घेऊन त्याला १ लाख चाळीस हजाराच्या बनावट नोटा दिल्या होत्या.
तसेच किसनराव दिपके या शेतकऱ्याला देखील बनावट पावणेदोन लाखांच्या नोटा देत ५८ हजार रुपये लांबवले होते. हे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींची माहिती काढली. संशयित आरोपी सागर देविदास अंभोरे (वय २४ रा. भैय्यासाहेब आंबेडकरनगर, खेमानी, उल्हासनगर) याला रेंज बार समोरून अटक करण्यात आली. आरोपीने साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.