मुंबई : फेरीवाल्यांचा कैवार घेणारे काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी भाज्यांचे हातगाडेच सोसायटीत घुसवण्याचा प्रयत्न केला. सोसायटीत घुसणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनसेनं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन पुकारलंय. जिथे दिसतील तिथे फेरीवाल्यांना मनसे स्टाईल प्रसाद देऊन हुसकावून लावत आहे. या विरोधात संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत फेरीवालेही तुम्हाला मारतील अशी उघड धमकी दिली होती. त्यानंतर मालाडमध्ये मनसे विभागप्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्यामुळे मनसे विरुद्ध संजय निरुपम असा वाद चिघळलाय.
आज याचा भाग म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्या घरावर हल्लाबोल केला. निरुपम यांच्या वर्सोव्यातील सोसायटीसमोर मनसेनं कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी स्वतः भाज्यांचे हातगाडे घेऊन निरूपमांच्या गोल्डन हाईट सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोसायटीत घुसण्यापासून रोखून धरलं. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.