मुंबई :पूजा चव्हाण प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. अशी माहिती उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत मी मंत्रिपदावर राहणं नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.” असं राठोड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे.
न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसा होणार नाही. असंही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
अजित पवार 8 तारखेला अर्थसंकल्प सादर करतील : मुख्यमंत्री
मी आणि माझ्या सहकारी व्यवस्था करतो आहे. पहिला अनुभव लक्षात घेता, दुसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न. जिथं रुग्णसंख्या वाढतेय तिथं उपचार वाढवतो आहोत. 8 तारखेला अर्थसंकल्प अजितदादा सादर करतील असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाचा धोका गेलेला नाही, किंबहुना वाढताना दिसतोय : मुख्यमंत्री
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे, गेल्यावर्षी याच दरम्यान कोरोनाने राज्यात प्रवेश केला. त्यानंतरचं एक वर्ष कसं गेलं याची आपल्याला कल्पना आहे, कोरोनाचा धोका गेलेला नाही, किंबहुना वाढताना दिसतोय असंही मुख्यमंत्री म्हणाले.
संजय राठोड पत्रात म्हणाले…
संजय राठोड यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे, “मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत खरं बाहेर यावं. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणं नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.”