Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडारमेश कराड यांचा निर्णय निवडणुकीनंतर : धनंजय मुंडे

रमेश कराड यांचा निर्णय निवडणुकीनंतर : धनंजय मुंडे

लातूर : विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीतच आहेत. पक्ष त्यांच्याबाबत विधानपरिषद निवडणुकीनंतर योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही देण्यात आलं. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली.

या सर्व नाट्यानंतर काल लातूर येथे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला रमेश कराड गैरहजर होते. आजमितीला ते राष्ट्रवादीत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कृतीनंतर निवडणुकीचा निकाल लागल्यावर पक्ष त्यांच्यावर निर्णय घेईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यात एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यावर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची पहिलीच घटना घडली आहे. रमेश कराड राष्ट्रवादीत आहेत, मात्र निकालानंतर पक्ष काय ठरवणार आहे ते आपल्याला कळवण्यात येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले. लातूर येथील विधानपरिषदेच्या उमेदवाऱ्याच्या प्रचार बैठकीला आले असता ते बोलत होते.

रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे

लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारला. कारण, भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या उमेदवारी मागे घेतली.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं. मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्वीस्ट आला आहे.

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख होती. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments