skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रआठवलेंची बौद्धिक क्षमताच नसल्याची प्रकाश आंबेडकरांची टीका

आठवलेंची बौद्धिक क्षमताच नसल्याची प्रकाश आंबेडकरांची टीका

मुंबई: दलित आणि ओबीसी समाज भाजप सरकारवर नाराज आहे. तरुणांमध्ये तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असंतोष धुमसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका या वर्षांतच होतील आणि त्यात भाजपचा दारुण पराभव होईल, असे भाकीत  भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव फेटाळून लावताना, आठवले यांच्यात नेतृत्वाची बौद्धिक क्षमताच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली. दि इंडियन एक्स्प्रेसआयोजित आयडिया एक्स्चेंजकार्यक्रमात ते बोलत होते.

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीबद्दल आपली ठोस व अभ्यासपूर्ण मते मांडली. ‘आंबेडकरी चळवळ चालविण्यासाठी मी सक्षम आहे, यापुढील राजकारणाचा राष्ट्रीय अजेंडा माझा असेल,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. सार्वत्रिक निवडणुका याच वर्षी होतील आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची जी अवस्था झाली, तशी  भाजपची होईल, असेही ते म्हणाले.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले, दगडफेक, जाळपोळ करण्यात आली, त्याच्या निषेधार्थ आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या वेळी नागरिकांचे हाल झाले, याकडे आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी बंद पुकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. भीमा कोरेगावमधील हल्ल्यानंतर दलित समाजातून तीव्र उद्रेक बाहेर आला. त्याला महाराष्ट्र बंदची हाक देऊन संघिटत करुन दलितांच्या भावनाना मोकळी वाट करुन दिली. तसे केले नसते तर हा उद्रेक हाताबाहेर जाऊन त्याचे विपरित परिणाम झाले असते, अशा शब्दात त्यांनी बंदचे समर्थन केले. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर आंबेडकरी चळवळीच्या अग्रस्थानी आले, मात्र भाजपबरोबर युती करुन केंद्रात मंत्रीपद मिळविणारे रामदास आठवले काहीसे पिछाडीवर गेले. त्यामुळे आठवले यांनी पुन्हा रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली. त्यासाठी मंत्रीपद सोडण्याची तयारीही त्यांनी दाखवली. याकडे लक्ष वेधले असता, आठवले यांची चळवळीत योगदान देण्याची बौद्धिक वा संघटनात्मक क्षमता नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली. आठवले यांच्याशी आपले शेवटचे बोलणे कधी झाले, असे विचारले असता, त्यावर मला कुणाशी बोलण्याची आवश्यकता नाही, ज्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी माझ्याकडे यावे, असे उत्तर त्यांनी दिले. गुजरात निवडणुकीनंतर जिग्नेश मेवाणीच्या रुपाने नवीन नेतृत्व उदयास आले आहे, त्याबद्दल विचारता, जिग्नेशने आधी गुजरातमध्ये आपला पाया पक्का करावा, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून दलित समाजाच्या विकासाची काही धोरणे राबविली जात आहेत, असे निदर्शनास आणले असता, त्यावर मोदी सरकारने नवीन काहीही केले नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनुसूचित जातींच्या विकासासाठी विशेष घटक योजना आणि अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्याचा निर्णय फार पूर्वीच झालेला आहे, असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments