Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन

सुप्रसिद्ध लावणी गायिका पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन

मुंबई: लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचं अल्पश: आजाराने आणि वृद्धापकाळाने निधन झालं. त्या १०२ वर्षांच्या होत्या. वाईच्या खाजगी रुग्णायलात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यमुनाबाईंच्या कलेतील योगदानामुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं. मराठी लोकसंस्कृतीचा महत्वाचा भाग असलेल्या तमाशा या कलाप्रकाराला यमुनाबाईंमुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. आपल्या लावणीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता.

तर तमाशा सोबतच ठुमरी, तराणा, गझल असे संगीतप्रकार सुद्धा त्या गात असत. तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचं काम यमुनाबाई वाईकर यांनी केलं आहे.

एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला : मुख्यमंत्री

‘लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला आहे.’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्य साधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.’ असंही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments