मुंबई: मनसेनं फेरीवाल्यांच्या विरोधात आपलं आंदोलन आणखी तीव्र करत आज विविध स्थानकांबाहेर झेंडा मोर्चा काढला. २१ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या आंदोलनाचा हा पुढचा टप्पा होता. सुरुवातीला फेरीवाल्यांना हाकलून लावणारे मनसैनिक आज दादर परिसरात तोंडावर पट्या बांधून आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रशासन काम करत नाही म्हणून आम्हाला काम करावं लागत. तर दुसरीकडे कायदा हातात घेतला म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही तुरुंगात डांबता. हे बरोबर नाही. असं मनसैनिकांचं म्हणणे होतं. दादर परिसरात हा मूक मोर्चा काढत असताना पोलिसांनी ३०-४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यात मनसे नेते नीतिन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, महिला नेत्यांना रिटा गुप्ता, माजिउ नगरसेविका स्नेहल जाधव यांचा समावेश होता.
दुसऱ्या बाजूला लोअर परळ परिसरात ही मनसे कार्यकर्त्यांनी झेंडा मोर्चा काढला. मोर्च्याच्या वेळी या परिसरात एकही फेरीवाला दिसला नाही. पण त्यांचं सामान मात्र बांधलेल्या स्वरूपात रस्त्यांवर दिसत होतं. फेरीवाल्यांवर अंकुश ठेवणे हे आमचे काम नाही. पण तरी आम्हाला ते करावं लागतं. आज आम्ही मोर्चा काढणार म्हणून बीएमसी, रेल्वे आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रित येऊन हा परिसर फेरीवाला मुक्त केला तसाच कायम ठेवता येऊ शकतो. तसा तो ठेवा एवढीच आमची मागणी आहे असं मत माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी व्यक्त केलं.