कर्जत : केंद्रात आत्तापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाही, देशात सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.
कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचा आज समारोप करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, केंद्रात आतापर्यंत कॉंग्रेसचेच सरकार टिकले आहे. बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते सर्वांना सोबत घेऊन जात होते. मात्र, सध्याचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार असे करताना दिसत नाही. देशातील लोकांना स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले, असे शरद पवार म्हणाले. आज मोठ्याप्रमाणात देशात मंदी वाढली आहे. तसेच, देशाला महागाईने ग्रासले आहे. सत्ता केंद्रित होणे धोकादायक आहे आणि जर, सत्ता केंद्रित झाली की देशातील वस्तुस्थिती कळत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
याचबरोबर, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर सुद्धा शरद पवार यांनी टीका केली. राज्यात गेल्या तीन वर्षांत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्य सरकारने शेतक-यांचा अपमान केला आहे. कर्जमाफीच्या फक्त घोषणा या सरकारने केल्या. मात्र शेतक-यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, शेतक-यांच्या शेतमालाला सध्या बाजारभाव मिळत नाही. लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले.
केंद्रात आतापर्यंत बिगर काँग्रेसची सरकारे टिकली नाहीत – शरद पवार
RELATED ARTICLES