मुंबई : पतीला दुस-या पत्नीकडून मूल नको यामुळे दोघांमध्ये खटके उडाले. दोघे पती पत्नी लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतांना भांडण झाले. भांडणादरम्यान, पतीने गर्भवती पत्नीला लोकल ट्रेनमधून बाहेर ढकलून दिलं. ही संतापजनक घटना दहीसर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
सागर धोडी (२५) असे आरोपीचे नाव आहे. सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपाऱ्याला जात असताना त्यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. रागाच्या भरात सागरने राणीला ट्रेनमधून बाहेर ढकलले. सुदैवाने यावेळी ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे राणीचे प्राण बचावले.
सागरचा हा दुसरा विवाह असून पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. दुस-या पत्नीपासून मूल नको होते त्यावरुन तो सतत माझ्या बरोबर भांडण करायचा असे राणीने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर सागर फरार झाला आहे. सागर विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सागर १५ नोव्हेंबरला तिला भेटायला गेला व त्याच्यासोबत मित्राकडे येण्यास सांगितले. राणी तयार झाली. त्यांनी बोरीवलीहून विरार लोकल पकडली. राणी आणि सागर दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्यात भांडण सुरु होते. ट्रेनने दहीसर सोडल्यानंतर सागरने तिच्या छातीत बुक्का मारला व तिला बाहेर ढकलून दिले.
राणीच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळयांना मार लागला. स्टेशन मास्तरने जीआरपीला याची माहिती दिल्यानंतर राणीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस आरोपी सागरचा शोध घेत आहेत.
सागरची पहिली पत्नी सोडून गेली…
सागरचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्यामुळे त्याची पहिली पत्नी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर एक नोव्हेंबरला सागरने राणी बरोबर दुसरे लग्न केले. राणीने लग्न केले त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती. सागरला राणीपासून मुल नको होते. यामुळे दोघांमध्ये खटके उडत होते.