Wednesday, December 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण…;आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा

मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण…;आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा

no-lockdown-plan-in-mumbai-says-iqbal-singh-chahal
no-lockdown-plan-in-mumbai-says-iqbal-singh-chahal

मुंबई: मुंबईकरांवर सध्या लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, असं सांगतानाच मात्र, मुंबईकरांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिला आहे.

मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इक्बालसिंग चहल यांनी मीडियाशी संवाद साधत हा इशारा दिला. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल 23000 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

याआधी जानेवारीत 10 ते 12 हजार चाचण्या होत होत्या. आता त्या सातत्याने वाढवत नेत आहोत, असं सांगतानाच मुंबईत दर 100 चाचण्यांमागे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट हा 6 टक्के आहे, असं चहल म्हणाले. इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन संदर्भात विचार होऊ शकतो. मात्र, मुंबईत ती स्थिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रुग्णसंख्या वाढली

राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉर् ठरलेल्या मुंबई शहरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबई शहरातील कोरोना रुग्ण संख्या एकेकाळी 2500 च्या घरात गेली होती. त्यांनतर पालिकेने केलेल्या नियोजनानंतर कोरोनाची रुग्ण संख्या 500वर आली होती. पण आता पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

अंशतः लॉकडाऊन?

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. दररोज वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आवश्यक असल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, असं अस्लम शेख म्हणाले. राजधानी मुंबई हे शहर अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशीच रुग्णवाढ कायम राहिली तर आगामी काळात येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शेख यांनी राजधानीत अंशत: लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.

रात्रीची संचारबंदी लागू होणार

दरम्या पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईत गर्दी होणाऱ्या ठिकाणी, मुंबईतील भाजी मार्केट, बाजारपेठा, लोकल, बेस्ट बसेस, विवाह कार्यक्रम, रात्रीचे पब बार या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात असं म्हटलं आहे. मुंबईत विवाह कार्यक्रमात 50 लोकांची परवानगी असताना गर्दी होत असल्याने कडक निर्बंध येऊ शकतात, तसेच शहरात रात्रीची संचारबंदी येऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकलची गर्दी, विवाह सोहळ्यांनी कोरोना वाढला

मुंबईत कोरोनाचे आकडे वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली असून केंद्रीय पथकांनी पाहणी केली आहे. या पथकांनी मुंबईत कोरोना आकडे वाढण्यासाठी मुंबई लोकल आणि विवाह कार्यक्रम कारणीभूत ठरत असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीत मुंबईतील आकडेवारी वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काल कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आता मुंबईतील वाढती कोरोना संख्या पहाता मुंबईत लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, काही निर्बंध लावले जातात हे पाहावं लागणार आहे.

कुठे, किती पॉझिटीव्हिटी रेट

>> पुण्याला 15%

>> विदर्भात 25% वर तर काही ठिकाणी 50%

>> नाशिक 15%

>> मुंबई 6%

>> मुंबईचा मृत्युदरही कमी झाला आहे. आधी मृत्यूदर 4.50% होता, तो आता 4.1% झाला आहे.

>> मुंबईतील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही 5% ने वाढली आहे

>> महिनाभरापूर्वी 80% सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होते. आता 85% टक्के आहेत.

>> गेल्या महिन्याभरात 21000 रुग्ण सापडले असून 15 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोनाची स्थिती

>> राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत.

>> काल राज्यात 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

>> तर मुंबईत काल 1 हजार 014 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

>> मुंबईत काल कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.

>> तर रविवारी मार्चला 1 हजार 360 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

>> मुंबईत सध्या 9 हजार 373 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments