Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई५०० हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंब झाडांच्या लागवडीचे ध्येय शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय...

५०० हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंब झाडांच्या लागवडीचे ध्येय शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी निम पार्क प्रकल्प – कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे

* ५०० हेक्टर जागेवर जास्तीत जास्त निम वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट * निंबोळी तेलाच्या उत्पादनासाठी पायलट प्रोजेक्ट * ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कडुनिंबाचे सेंद्रिय कीटकनाशक उपलब्ध करून देण्यासाठी विविध तालुक्यांमध्ये निम पार्क तयार करण्यात येणार असून पायलेट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ५०० हेक्टर रिक्त जागेवर सर्वाधिक कडुनिंबाच्या झाडांची लागवड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या पासून बनणाऱ्या निंबोळी तेलाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होईल असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी आज येथे केले.

मंत्रालयात निम पार्क तयार करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजना बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कडुनिंबाच्या उत्कृष्ट वापराबाबत अधिक माहिती देताना कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, निमझाडांची रोपवाटिका तयार करून वृक्षलागवडीसाठी सर्वप्रथम जिल्हा स्तरावर उपलब्ध रिक्त जागेची पाहणी करण्यात यावी. त्यासोबतच ज्या निम झाडांमधून दर्जेदार व मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल व जी प्रजाती महाराष्ट्रातील वातावरणात चांगल्या प्रकारे वाढेल अशाच प्रजातीची निवड करण्यात यावी.

५०० हेक्टर जमिनीवर जास्तीत जास्त निमझाडांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून त्या झाडांची वाढ उत्तम प्रकारे होण्यासाठी आवश्यक गोष्टींचा आराखडा तयार करण्यात यावा. त्यामध्ये झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आजूबाजूला वावडुंग सारख्या परस्पर पूरक झाडांची लागवड करणे अशा उत्तम कृषी पध्दतींचा समावेश करण्यात यावा. व याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार नवीन लागवड केलेल्या झाडांची वाढ होईपर्यंत त्या कालावधीत उपलब्ध असलेल्या निंबोळ्यांचे उत्कृष्ट तेल काढण्याच्या पद्धतीने (सुपर क्रिटिकल एक्सट्रॅक्शन पद्धत) उत्पादन सुरू करावे. व त्याचा दर्जा सुधारण्यासाठी संशोधन देखील सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले, या प्रकल्पासाठी प्रांतअधिकारी श्री देशमुख यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या वृक्षलागवडीमुळे शेतकऱ्यांना फायदा होऊन राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या ध्येयाला मोठा हातभार लागणार आहे.

बैठकीस कृषी सचिव एकनाथ डवले, सह सचिव अशोक आत्राम, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक विजय घावटे, कीटक शास्त्र विभागाचे मुख्य पिक संरक्षण अधिकारी डॉ अनिल कोल्हे त्याचबरोबर कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments