मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यासह कुटुंबियांवर सुनेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ‘सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्क साधला’, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
आमदार विद्या चव्हाण यांच्यावर सुनेचा छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. विद्या चव्हाण आणि कुटुंबातील इतर चार सदस्यांविरूद्ध सुनेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. आमदार विद्या चव्हाण यांच्यासह पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण कुटुंबियांविरुध्द विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं…
विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की,’नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आलं आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलीला देखील मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. त्यामुळे मुलाला दुसरीही मुलगी झाली म्हणून माझ्यावर करण्यात आलेले हे आरोप चुकीचे आहेत. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं असून कायदा दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा गैरवापरही करण्यात येऊ शकतो. कायद्याचा कुणी चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहिल’.