Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई...तर युतीचा विषयच भाजपाकडून संपला- मुनगंटीवार

…तर युतीचा विषयच भाजपाकडून संपला- मुनगंटीवार

मुंबई : शिवसेनेला भाजपसोबत युतीच करायची नसेल तर आमच्याकडूनही हा विषय संपला, अशी संतप्त प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. मतविभाजन टाळण्यासाठी आम्ही युतीबाबत आग्रही आहे पण उद्धव ठाकरेंनी युती न करण्याचा निर्णय घेतला असेल तर भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव संपला असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

भाजप आणि शिवसेना पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यावरूनही आमने-सामने आले आहेत. ‘भाजपशी युती नाही म्हणजे नाहीच’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मराठवाड्याच्या दौऱ्यात औरंगाबाद येथे केली. त्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले, विरोधक एकत्र येत असताना भाजप-शिवसेनेने एकत्र येत युती व मतविभाजन टाळून ताकदीने निवडणूका लढाव्यात असे आमचे म्हणणे आहे, होते पण आता शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. शिवसेनेला आमच्यासोबत युतीच करायची नसेल तर भाजपकडूनही तसा प्रस्ताव देण्याचा विषय संपतो. युती करण्यासाठी दोन पक्ष राजी व्हावी लागतात. नुसते आम्ही युती व्हावी म्हणून काय उपयोग अशी नाराजीचा सूरही मुनगंटीवार यांनी लावला.

दरम्यान, पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यावरूनही भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी विधानसभा निवडणुका घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन नागपूरात घेण्याच्या फडणवीस सरकारच्या हालचाली सुरू आहेत. यावरही उद्धव ठाकरेंनी जोरदार विरोध भाजपवर हल्ला केला आहे.

संसदीय प्रथेप्रमाणे पावसाळी अधिवेशन हे मुंबईतच झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये मांडली आहे. हिवाळी अधिवेशन विदर्भात घेण्याची प्रथा आहे. नागपूरला नुसते अधिवेशन घेऊन काय होणार, त्यापेक्षा विकास योजना द्या, असा टोलाही उद्धव यांनी हाणला होता. तसेच परंपरेप्रमाणे मराठवाड्यातही मंत्रिमंडळाची बैठक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली व त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगत भाजपला अडचणीत आणले. यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवर म्हणाले, पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर मग अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घ्यावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments