Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात - गडकरी

मुंबई-गोवा क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात – गडकरी

मडगाव : गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारी गोवा-मुंबई क्रूझ बोट सेवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासोबतच मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का ते नवी मुंबई हा परिसर रो-रो सेवेअंतर्गत जोडला जाणार असल्याची केंद्रीय जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात जाहीर केले.

दक्षिण गोव्यातील बाणावली येथे जहाजोद्योग मंत्रलयाची सहामाही आढावा बैठक चालू असून या बैठकीच्या दरम्यान गडकरी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, गोव्याच्या पर्यटन वृद्धींसाठी विमानतळावर उतरलेल्या पर्यटकाला रस्त्यावरून हॉटेलात न आणता किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स जलमार्गाने जोडण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक हॉटेलने आपली स्वत:ची तरंगती जेटी तयार करावी. जेणेकरून पर्यटकाची रस्त्यावरून ये-जा करण्याची दगदग कमी होणार आणि समुद्र सफरीचा आनंदही तो घेऊ शकेल.

गोव्यातील प्रस्तावित मोपा विमानतळ दाबोळी विमानतळाला जलमार्गाने जोडता येणे शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाईल असे त्यांनी सांगितले. मुंबईतील रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी भाऊचा धक्क्का, मांडवा, नेरळ व नवी मुंबई जलमार्गाने जोडून वाहनांची वाहतूक बोटीतून रो-रो सेवेद्वारा केली जाणार असून त्यामुळे कित्येक तासांचा प्रवास काही मिनिटात होऊ शकेल असे ते म्हणाले. मुंबईच्या जेएनपीटी बंदराचा खास आर्थिक विभाग (सेझ) म्हणून विकास करण्याचा इरादा स्पष्ट करताना यामुळे सव्वा लाख नव्या नोक-या तयार होतील असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील वढण येथे नवे बंदर विकसित करण्याबरोबरच विजयदुर्ग बंदराचाही विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जेएनपीटी बंदरावर मल्टीस्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारले जाईल अशीही माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments