‘एक पल’,’रुदाली’,’चिंगारी’ असे महिलाप्रधान सिनेमा बनवणा-या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांची अवस्था सध्या बिकट बनली आहे. किडनी निकामी झाल्यानं त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कल्पना यांना सोमवारी सकाळी आयसीयूमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती त्यांच्या आई ललिता लाजमी यांनी दिली आहे.
६१ वर्षीय कल्पना यांना आठवड्यातून ४ वेळा डायलिसिस करावं लागतं. इतकंच नाही तर कल्पना यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा बिकट बनली आहे. त्यामुळं रुग्णालयाचं बिल चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी भरलं आहे. आमिर खान आणि रोहित शेट्टी यांनी कल्पना याचं बिल भरण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतल्याची माहिती दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी आमिर आणि रोहित यांचे ट्विटरवरुन आभारही मानलेत.कल्पना यांचा अखेरचा सिनेमा दमन हा २००१ साली रसिकांच्या भेटीला आला होता.रुदाली या सिनेमासाठी कल्पना लाजमी यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. कल्पना या जवळपास ४० वर्षे संगीत दिग्दर्शक भूपेन हजारिका यांच्या बिझनेस पार्टनर होत्या. भूपेन हजारिका यांच्यावर बायोपिक बनवण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र आता त्यांची ढासळती प्रकृती पाहता ते अशक्य असल्याचे बोललं जात आहे. किरण खेर, सुश्मिता सेन, तब्बू,रवीना टंडन यांच्यासह कल्पना लाजमी यांनी काम केले आहे. त्यांच्या तब्येतीत काहीशी सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.२ वर्षांपूर्वी मी पूर्णपणे अंथरुणाला खिळून होते मात्र आता ईश्वरकृपेने तब्येत सुधारत आहे अशी प्रतिक्रिया खुद्द कल्पना लाजमी यांनी दिली आहे. कोणत्याही आणि कुणाच्याही आधाराशिवाय आणखी किमान दीड वर्षे चालू शकते असा दृढविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या बिकट परिस्थितीत चित्रपटसृष्टी पाठिशी उभी राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानलेत. विशेषतः आई, भाऊ आणि श्याम बेनेगल यांचा उल्लेख करायला त्या विसरल्या नाहीत.कायम साथ दिल्याबद्दल कल्पना लाजमी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.