पुणे : राज्यभर सुरू असलेल्या बसच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यावेळी पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर चक्क आपल्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट दिली.
एकीकडे बसच्या संपानं त्रस्त असलेल्या प्रवाशांना सुप्रिया सुळेंनी दिलेल्या लिफ्टमुळे आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळी प्रवाशांनी एसटी संपाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. आज सकाळच्या वेळी सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी बस स्थानकावर प्रवाशांशीही त्यांनी बातचीत केली. त्यानंतर काही प्रवाशांना त्यांनी आपल्या गाडीतून लिफ्ट दिली.
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. १७ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे.