अमरावती – अर्जेंटिना येथे पार पडलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या शुकमणी बाबरेकर याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत सांघिक स्पर्धेत देशाला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. अंतिम फेरीत जाण्यापूर्वी त्याने विश्वविजेत्या संघावर मात केली. स्थानिक क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू शुकमणी बाबरेकर सन २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.
शुकमणी बाबरेकर हा २०१५-१६ मध्ये अमरावतीच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला. तीन वर्षांपासून त्याच्या कामगिरीचा आलेख चढता आहे. ज्युनिअर व सिनीअर स्पर्धांमध्ये आतापर्यंत १० पदके त्याने खिशात घातली आहेत. २०१६-१७ मध्ये सेऊल (द. कोरिया) येथे आयोजित युवा आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत त्याने सांघिक प्रकारात देशाचे कांस्यपदकावर नाव कोरण्यासाठी विशेष कामगिरी केली. सन २०२४ मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय धनुर्धरांच्या संभाव्य संघात त्याचा समावेश झाला आहे.
शुकमणीला समीर मस्के, प्रफुल्ल डांगे, सुनील ठाकरे, विजय फसाटे या क्रीडा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर व सदानंद जाधव यांच्यासह क्रीडा विभाग व विविध संघटनांकडून शुकमणीचे कौतुक होत आहे.