नागपूर : भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. येत्या १५ तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एका वृत्तवाहीनीला दिली आहे.
नाना पटोले उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. शिवाय ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. १० दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र मोदींना लिहिलं होतं. पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
यापूर्वीही नाना पटोलेंचा भाजपला घरचा आहेर
नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.
नोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी दसऱ्याच्या दिवशी बोलताना जाहीर केलं होतं.