मुंबई: केंद्र आणि राज्य सरकार तीन वर्षाच्या कार्यकाळात पूर्णपणे अपयशी ठरले असून या सरकारविरोधात लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या जनविरोधी निती आणि तीन वर्षातल्या अपयशी कारभाराविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन करण्याचे ठरले असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी ३१ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथून या जनआक्रोश आंदोलनाचा शुभारंभ होणार असून राज्याच्या सर्व सहा विभागात सहा जाहीर सभा होणार आहेत. ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या काळ्या निर्णयाला एक वर्ष होणार आहे त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काळा दिवस म्हणून पाळणार आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
आज झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री रोहिदास पाटील, शिवाजीराव मोघे, नसीम खान, बस्वराज पाटील, अब्दुल सत्तार, अमित देशमुख आ. भाई जगताप, आ. रामहरी रूपनवर, महिला काँग्रेसच्य प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे उपस्थित होते.