मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. बुधवारी दादर परिसरात फेरीवाल्यांच्या मुद्यावरुन मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते. या राड्यानंतर आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षावर पोहोचले आहेत.
डोबिंवलीकरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार राज ठाकरे
पाच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कल्याण डोंबिवली दौरा झाला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याण डोंबिवलीतील काही प्रतिष्ठीत नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत डोंबिवलीच्या काही जेष्ठ नागरिकांनी, वास्तू विशारदांनी “कलेक्टर लँडचा” मुद्दा उपस्थित करून त्याबाबबतीतल्या अडचणी सांगितल्या होत्या तसेच काही तरुणांनी व्यवसाय उभा करताना इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात येणाऱ्या अडचणी बाबतचा फरक उदाहरणांसह दाखवून दिला होता. या दोन्हीं समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन व काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, त्यावेळी तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर मुख्यमंत्र्यांकडे, या असे आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होतं. त्यानुसार राज हे कल्याण डोंबिवलीकरांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.