skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्रालयाचे 'आत्महत्यालय' झाले- राज ठाकरे

मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ झाले- राज ठाकरे

मुंबई: भाजपाचे नेते दावा करतात त्याप्रमाणे त्यांचे सरकार खरंच वेगळे आहे. कारण त्यांच्या काळातच मंत्रालयाचे आत्महत्यालय झाले, असा उपरोधिक टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. या पार्श्वभूमीवर राज यांनी भाजपाला धारेवर धरले.
 
आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल, असे निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने सांगत असत. खरेच हे सरकार आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ बनले आहे. आज शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्याकरण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजपा सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असे राज यांनी म्हटले.  नगरमधील युवकाचा मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण काँग्रेसच्या काळातले असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. गेले तीन वर्षे भाजपा सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजपा सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवालही यावेळी राज यांनी उपस्थित केला. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना विषप्राशन करून आत्महत्या केली होती. त्याचवर्षी राजू आंगळे या तरुणाने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. मात्र, जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, अशी टीका राज यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments