skip to content
Sunday, May 19, 2024
Homeकोंकणठाणेमुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन 50 टक्के निधी उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री...

मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन 50 टक्के निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल. 26 व 27 जुलै रोजी बदलापूर-कल्याण परिसरात पूरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून राज्य शासन नुकसानग्रस्तांना भरीव मदत करेल आणि गरज भासल्यास नव्या निकषानुसार शासन निर्णय काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळयाचे अनावरण, पोलस स्टेशन मुरबाड आणि पोलीस अधिकारी/कर्मचारी वसाहत उद्घाटन समारंभात श्री.फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण माझ्या हस्ते झाले हा माझ्या दृष्टीने भाग्याचा दिवस आहे. आज विविध कामांची सुरुवात या भागात होत आहे. शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य केले. महाराजांनी सामान्य माणसाला जागृत करून त्यांच्यात ऊर्जा निर्माण केली. गेली 5 वर्षे आम्ही शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेऊन काम करीत आहोत. त्यामुळे कितीही संकटे आली तरीही मार्ग काढला आणि विकास केला.

परवाच्या पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. 2005 मध्ये प्रती घरटे 5 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जात होती. यात भरीव मदत करण्याचा शासन निश्चित विचार करेल असे त्यांनी सांगितले. पुरामुळे जे रस्ते खराब झाले आहेत. त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नागपूर समृध्दी महामार्ग 24 जिल्ह्यांसाठी विकासावर परिणाम करणारा आहे. हा महामार्ग गेमचेंजर म्हणून ओळख देईल. बदलापूर येथील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत करावी अशी त्यांनी मागणी केली.

आ.किसन कथोरे यांनी या भागातील माळशेज घाटाला चीनच्या धर्तीवर काचेच्या स्कायवॉकसाठी मंजूरी मिळावी, अशी मागणी केली. या भागातल्या रस्त्यांसाठी शासनाने जी भरीव मदत केली, त्याबद्दल त्यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते एस.टी.स्टॅण्डचे भूमिपुजन, धान्याच्या गोदामाचेही भूमिपुजन आणि म्हसा येथील महाविद्यालयाचेही ई-भूमिपुजन करण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार कपिल पाटील, आमदार सर्वश्री नरेंद्र पवार, किसन कथोरे, निरंजन डावखरे, माजी आ. गोटीराम पवार, दिगंबर विशे, नगराध्यक्ष सौ.शितल तोंडलीकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष पवार, कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments