ठाणे: शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, सून, नातवंडे आणि भाऊ असा परिवार आहे.
अनंत तरे यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी 2 वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राजकीय, सामाजिक चळवळीत मोठं योगदान
अनंत तरे हे ठाण्याचे माजी महापौर होते. त्यानंतर 2000मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. 2008मध्ये त्यांची शिवसेना उपनेते म्हणून निवड करण्यात आली. 2015 मध्ये त्यांची पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. ते कोळी समाजाचे नेते होते. शिवाय एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते. राजकारणाबरोबरच त्यांचं सामाजिक चळवळीती योगदान मोठं होतं. त्यांच्या जाण्याने ठाणे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
सलग तीन वेळा महापौर
ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी 1993 मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं. त्यानंतर 1994 आणि 1995 सालीही महापौरपद भूषविलं होतं. ठाण्यात महापौरपदाची हॅट्रीक साधणारे ते एकमेव नगरसेवक होते. 2000मध्ये विधान परिषदेवर ते निवडून गेले होते. त्यानंतर 2006 मध्येही ते विधान परिषदेसाठी उभे होते. मा६, यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापल्याने ते नाराज झाले होते.
अनंत तरे यांच्याविषयी…
>> अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते.
>> त्यांनी ठाणे महापालिकेचे महापौरपद भूषविलं होतं.
>> ते 2000 ते 2006 या दरम्यान विधानपरिषदेवर आमदार होते.
>> शिवसेनेचा कोळी समाजाता बडा चेहरा अशी त्यांची ओळख होती.
>> एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते.
>> 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यावरुन त्यांचे शिवसेनेशी मतभेद झाले होते. मात्र त्यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला यश आलं.
>> शिवसेनेने 2015 मध्ये त्यांची पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी वर्णी लावली होती.