मुंबई- दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. मी केलेल्या विधानाबदद्ल मला खंत असल्याचं स्पष्टीकरणही गिरीश महाजन यांनी दिलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या व्यक्तव्यावर चौफेर टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी माफीनामा दिला आहे.
महिलांबद्दल वक्तव्य करणं यात माझी चूक झाली असून मी नकळतपणे बोललो, त्यामुळे सगळ्या महिलांची मी माफी मागतो, असं गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे.
काय म्हणाले होते गिरीश महाजन ?
विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला. शहादा येथे सातपुडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी पश्चिम महाराष्ट्रात विविध मद्याची नावं स्त्रीवाचक असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे त्यामुळे सातपुडा साखर कारखान्यानेही त्यांच्या ब्रँडचे नाव ‘महाराणी’ करावं, असा सल्ला दिला.
साखर कारखान्यांच्या मद्यार्क निर्मिती ब्रँडची नावे भिंगरी, ज्युली असे असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे. स्त्रीवाचक नावे असलेल्या गुटखा उत्पादनांचा खपही वाढतो आहे, असंही ते म्हणाले.
महाजन यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी महाजन यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. गिरीश महाजन यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी पुण्यात केली. तर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे महाजन यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्या प्रतिमेला चपला मारून तसंच दारुच्या रिकाम्या बाटल्या फोडून निषेध व्यक्त केला.