Friday, June 21, 2024
Homeदेश४८ रेल्वेगाड्यांची ‘सुपरफास्ट’ तिकीट वाढ

४८ रेल्वेगाड्यांची ‘सुपरफास्ट’ तिकीट वाढ

रेल्वेच्या तिकीट दरांमध्ये ३० ते ७५ रुपयांची वाढ

दिल्ली: भारतीय रेल्वेने ४८ एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा दिला आहे. मात्र गाड्यांना सुपरफास्ट दर्जा देऊन रेल्वेने या गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवास करताना आता ३० ते ७५ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. या ४८ गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केल्याने ७० कोटी रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा रेल्वेला आहे. रेल्वेने ४८ गाड्यांचा समावेश सुपरफास्ट प्रकारात केल्याने आता सुपरफास्ट गाड्यांची एकूण संख्या १ हजार ७२ झाली आहे.

रेल्वेने ४८ गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. या गाड्यांमधील स्लिपर कोचचे तिकीट ३० रुपयांनी, सेकंड आणि थर्ड एसीचे तिकीट ४५ रुपयांनी आणि फर्स्ट एसीचे तिकीट ७५ रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-चंदिगढ एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-नांदेड एक्स्प्रेस, दिल्ली-पठाणकोट एक्स्प्रेस, कानपूर-उधमपूर एक्स्प्रेस, छपरा-मथुरा एक्स्प्रेस, रॉक फोर्ट चेन्नई-तिरुचिलापल्ली एक्स्प्रेस, बंगळुरु-शिवमोगा एक्स्प्रेस, टाटा-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, दरभंगा-जालंधर एक्स्प्रेस, मुंबई-मधुरा एक्स्प्रेस आणि मुंबई-पाटणा एक्स्प्रेसचा प्रवास महागणार आहे.

विशेष म्हणजे रेल्वेने ज्या गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देऊन अतिरिक्त तिकीट दर लागू केले आहेत, त्यांच्या वेगात फार मोठा फरक पडलेला नाही. या गाड्यांचा वेग केवळ ५ किलोमीटर प्रतितास इतका वाढला आहे. त्यामुळे आधी ५० किलोमीटर प्रतिसास वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या आता ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावतील. मात्र रेल्वेच्या वेगामध्ये झालेली ही वाढ सोडल्यास रेल्वेकडून इतर कोणत्याही नव्या सेवा देण्यात आलेल्या किंवा रेल्वेत नव्या सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय रेल्वेचा वेग वाढल्यावरही त्या वेळेवर धावतील, याची कोणतीही खात्री नाही. उत्तर भारतात हिवाळ्याला सुरुवात झाल्यामुळे बऱ्याच रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. याला राजधानी, दुरन्तो, शताब्दी यांच्यासारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यादेखील अपवाद नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments