Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रदोन महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा!: विखे पाटील

दोन महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा!: विखे पाटील

मुंबई: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी सहा महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. परंतु,अभियोग्यता चाचणी झालेली असताना सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशाला हवा? सरकार प्रामाणिक असेल तर तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून दोन महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

शिक्षण मंत्र्यांच्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, सवंग लोकप्रियतेसाठी वाट्टेल ती घोषणा करण्याची या सरकारची भूमिका यापूर्वी अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे २४ हजार शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियोग्यता चाचणी यापूर्वीच झालेली असल्याने उर्वरित प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करणे शक्य आहे. सरकार प्रामाणिक असेल तर पुढील २ महिन्यात २४ हजार शिक्षकांची भरती झालीच पाहिजे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही सुरू झाली नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दिला.

भारतीय जनता पक्षाने देशात वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात दिवसाला फक्त ४५० म्हणजे वर्षाकाठी २ लाखांपेक्षा कमी रोजगाराची निर्मिती होते आहे. रोजगारनिर्मितीचे आश्वासन पूर्ण करता आले नाही म्हणून सरकारने माफी मागण्याऐवजी पकोडे विकण्याचा फुकटचा सल्ला देऊन बेरोजगारांची थट्टा होत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला.

तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने फॉक्सकॉन कंपनीशी ५ बिलियन डॉलर्सचा करार झाल्याचे सांगून यातून ५० हजार थेट रोजगार निर्माण होईल, अशी घोषणा केली होती. त्याचा प्रचंड गाजावाजा अन् जाहिरातबाजीही केली होती. पण फॉक्सकॉनने राज्यात ना एक रूपया गुंतवला ना एखादी नोकरी दिली. सरकारच्या पोकळ घोषणाबाजीचे हे मोठे उदाहरण आहे. देशात खासगी क्षेत्रात रोजगार निर्मिती नाही. सरकारी नोकऱ्याही नाहीत. शासकीय रिक्त पदे रद्द केली जात आहेत. त्यामुळेच बेरोजगार तरूणांनी गेल्या आठवड्यात राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे काढले, याचेही स्मरण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला करून दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments