Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिककरांच्या प्रश्नांसाठी भाजपला सळो की पळो करून सोडा- राज ठाकरे

नाशिककरांच्या प्रश्नांसाठी भाजपला सळो की पळो करून सोडा- राज ठाकरे

महत्वाचे….
१.नाशिकमध्ये चांगली कामे करूनही पराभव राज ठाकरे यांनी व्यक्त केली खंत २. नाशिककरांना आताच्या भाजपच्या कारभारावरून कळून चुकले असेल ३. लोकांचा कोणताही रागराग न करता सत्ताधाऱ्यांना जाब विचारा.४. निवडणूका हरल्याचा पश्चाताप नाही.


नाशिक- जेथे अन्याय दिसेल तेथे लाथ मारण्याची हिमंत दाखवा, माझ्यामागे कोणी नाही असे रडगाणे करू नका, प्रत्येक वेळी राज ठाकरे येईल असाही भ्रम बाळगू नका. तुम्ही प्रत्येक जण राज ठाकरेच हात हे लक्षात घेवून नाशिककरांच्या प्रश्नासाठी भाजपाला सळो की पळो करून सोडा असे चेतवण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील निवडक पदाधिकारी मेळाव्यात केला.

चोपडा बॅक्वेट हॉल येथे झालेल्या मेळाव्यात राज यांनी संघटनेची मरगळ दुर करून नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. राज म्हणाले, मला मार खावून येणारा मनसैनिक आवडत नाही. अनेक जण येतात आणि म्हणतात याने मला मारले. त्यांचे काय करायचे ते करेन परंतू मार देवून आलेला मनसैनिक मला नक्कीच आवडेल. तक्रारी असणारा मनसैनिक मला चालेल. उलट त्यास शाबासकीच देईल. तक्रार आल्यानंतर शहानिशा करून त्याचा काय तो बंदोबस्त करेन. याचा अर्थ कोणीही उठून कोणालाही मारेन असा माझा आदेश नाही. पराभव झाला म्हणून खचू नका, खचणारे मला आवडत नाही व असे लोक पुढेही जात नाही. पराभवांची मालिका लहानपणापासून बघत आलो. लोकसभा हरलो, विधानसभा हरलो, महापालिका हरलो. परंतु मला फरक पडत नाही, माझी सत्ता रस्त्यावर असून त्याची प्रचिती मुंबईत रेल्वे स्थानकावरील अनाधिकृत फेरीवाल्यांना हटवून दाखवली आहे, असेही राज यांनी सांगितले.

मुंबईतील रेल्वे आंदोलन मोर्चाबाबत राज ठाकरे म्हणाले, जे काम सरकार, रेल्वे प्रशासन व कोणत्याही राजकीय पक्षाला जमले नाही तेच मनसेने एका मोर्च्यात करून दाखवले. त्यामुळे तुम्ही स्थानिक प्रश्नावर आक्रमक व्हा, अभ्यासपुर्वक आंदोलन करा, प्रसिद्धीसाठी चॅनेल्सला सोबत घेवून वायफळ आंदोलन करू नका अशी तंबीही दिली. आंदोलन हे आंदोलनच असले पाहिजे, म्हणजे त्याची गांर्भियाने दखल घेतली जाईल अशा कानपिचक्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना दिल्या.

घरवापसी करणाऱ्यांची पहिलीपासून सुरूवात-

मनसेला रामराम करून घेणारे मात्र अन्य पक्षात डाळ न शिजणारे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक पुन्हा पक्षात येण्यासाठी धडपडत असल्याकडे राज यांनी लक्ष वेधले. मात्र त्यांना पहिलीपासून सुरूवात करावी लागेल. पक्षाच्या प्रतिकुल परिस्थितीत निष्ठेने उभे राहिलेल्यांना पुढील आठवड्यानंतर निश्चित होणाऱ्या कार्यकारणीत महत्वाचे स्थान असेल. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह येणारे पदाधिकारी फेररचना करतील असे स्पष्ट केले.

ता समजेल नाशिककरांना राज काय करीत होता ?-

नाशिकमध्ये चांगली कामे करूनही पराभव झाल्याचे शल्य बोलून दाखवताना राज ठाकरे सत्तेत असताना काय करीत होता हे नाशिककरांना आताच्या भाजपच्या कारभारावरून कळून चुकले असेल. पुढील पाच वर्षाची सत्ता मनसेच्या हातात असती तर कदाचित नाशिक महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहर असते असा दावाही त्यांनी केला. मात्र शेवटी हे नाशिकच्याच भाग्यात नव्हते हेही लक्षात घेतले पाहिजे. लोकांचा कोणताही रागराग न करता त्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारा असाही त्यांनी सल्ला दिला.

सोशल मिडियावरून कार्यकर्त्यांची खरडपट्टी-

सारखे सारखे सेल्फी काढणारे व सतत सोशल मिडीयावर पांचट संवादात रमणाऱ्या मनसैनिकांची राज यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. मी तुम्हाला भेटायला येतो, परंतू तुम्हाला फोटोत रस असतो असा उलट जाब त्यांनी कार्यकर्त्यांनाच विचारला. मनगटातील ताकद फोन उचलण्यात घालवू नका असे सांगताना चांगली माहिती लोकापर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर
करा असाही संदेश दिला.

प्रसारमाध्यमांबाबत पुन्हा तिटकारा-

मनसेची सत्ता गेल्यानंतर त्यास जणू काही प्रसारमाध्यमच जबाबदार की काय असा तिटकारा राज यांच्या दौऱ्यात दिसून आला. त्यांनी पदाधिकारी मेळाव्यात माध्यमांना प्रवेश नाकारला. बंद दालनातील मार्गदर्शन मेळाव्यात त्यांनी चॅनेल्सलासोबत घेवून प्रसिद्धीसाठी आंदोलने करू नका अशी तंबीही दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments